बैलपोळा सणाला सुट्टी द्या, हा दिवस ‘बळीराजा दिन’ म्हणून घोषित करा – प्रतिभा धानोरकर

 

आज बैलपोळ्याचा सण आहे. मागील दोन वर्ष कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा सण उत्साहात साजरा करता आला नव्हता. यंदा मात्र, कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळं हा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. दरम्यान, बैलपोळा सणाला सरकारनं शासकीय सुट्टी जाहीर करावी. तसेच हा दिवस ‘बळीराजा दिन’ म्हणून घोषित करा अशी मागणी काँग्रेसच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

शेतकऱ्यांच्या कष्टाबाबत आपण नेहमीच चर्चा करतो. मात्र, शेतकऱ्यांसोबत आणखीण एक जण आहे, जो शेतात खूप राबतो. तो म्हणजे बैल. आपल्या मालकाला त्याच्या कष्टाचे चीज मिळेपर्यंत तो शेतात राबतो. याच कष्टकरी बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो. आज बैलाची देव समजून पूजा केली जाते. त्यामुळं बैलपोळा या सणाला महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी.

तसेच हा दिवस ‘बळीराजा दिन’ म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्यात यावा अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पोळ्याच्या दिवशी फक्त बैलांचीच नाही तर शेतीसाठी लागणाऱ्या नांगर, विळी, कोयता, खोर इत्यादी साधनांची देखील पूजन केले जाते. बैलाचे शेतकऱ्यांवरती अनंत उपकार असतात. ते उपकार शेतकरी फेडू शकत नाही. म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण अगदी आत्मियतेने साजरा केला जात असल्याचे धानोरकर यांनी म्हटल आहे.

Team Global News Marathi: