शिक्षक अन विद्यार्थ्यांची दिवाळी सुट्टी वाढली; शनिवारपासून असेल सुट्टी

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा ऑनलाईन माध्यमातून शाळा आणि शिक्षण  सुरू आहे. शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने यंदा केवळ पाच दिवसच शाळांना सुट्टी जाहीर केली होती. यानंतर शिक्षक संघटनांनी सुट्टी वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता राज्य सरकारने शाळांची दिवाळी सुट्टी  वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भात शासन परिपत्रक काढण्यात आले आहे.



अशी आहे दिवाळीची सुट्टी 

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भावनांचा आदर करुन तसेच त्यांच्या दिवाळीच्या सुट्टीच्या मागणीचा विचार करुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२० पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पाच नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार १२ ते १६ नोव्हेंबर २०२० अशी सु्टी देण्यात आली होती. आता या सुट्टीत बदल करुन १४ दिवसांची सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

यापूर्वी पाचच दिवसांची सुट्टी केली होती जाहीर 

५ नोव्हेंबर रोजी राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने परिपत्रक काढून पाच दिवसांचीच दिवाळी सुट्टी जाहीर केली होती. राज्य शासनाने काढलेल्या या परिपत्रकात म्हटले होते की, “राज्यात कोविड-१९ या महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरू करमे शक्य नसल्याने दिनांक १५ जून २०२० पासून शैक्षणिक वर्ष सुरू करुन स्थानिक परिस्थितीनुसार, प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना या विभागाच्या दिनांक १५ जून २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या दिनांक २२ जुलै २०२० च्या परिपत्रकातील सूचनेनुसार इयत्ता पूर्व प्राथमिक ते १२वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे.

माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, तसेच एकूण कामाचे दिवस २३० होणे आवश्यक आहे. इयत्ता १ली ते ५वीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान २२० होणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने दिनांक १२ नोव्हेंबर ते दिनांक १६ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सन असल्याने शाळांना सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेले अद्यापनाचे कामकाज बंद राहील.”

ग्लोबल न्युज नेटवर्क: