शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केलाय. शिवसैनिकांनं गाडीवर दगड भिरकावल्याने त्यांच्या गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्याला थोडीशी दुखापत झाली आहे.
मुंबई :अपक्ष आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेले होते. किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांना बाजूला करुन किरीट सोमय्यांची गाडी तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, यादरम्यान एका शिवसैनिकांनं गाडीवर दगड भिरकावल्याने गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्याला थोडीशी दुखापत झाली आहे. पंचनामा होत नाही तोपर्यंत किरीट सोमय्यांनी गाडीतून खाली उतरणार नसल्याची भूमिका घेतली आहे. किरीट सोमय्यांनी या घटनेनंतर धक्का बसल्याचं म्हटलं आहे. सोमय्यांनी या घटनेनंतर भाजप नेत्यांशी चर्चा देखील केली आहे.