अखेर महिंद्रांनी दिलेला शब्द पाळला; दत्तात्रय लोहारला गिफ्ट; बोलेरो गाडी पाहताच अश्रू अनावर
देवराष्ट्रे (सांगली) : ‘दिस जातील दिस येतील, भोग सरंल, सुख येईल’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे दत्तात्रय लोहार यांचा संसाराचा गाडा सुरु होता. त्यांच्या कल्पकतेने बनवलेल्या मिनी जिप्सीमुळे देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांची देशभरात ओळख झाली. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी चक्क बोलेरो (Bolero)देतो असे ट्विट केले.
आणि आज महिंद्रा कंपनीने बोलेरो दत्तात्रय लोहार (Dattatraya Lohar) यांना सुपूर्त केली आहे. व दत्तात्रयने त्याची मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीकडे दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द खरा केला. यामुळे आज लोहार कुटुंबीय आनंदी आहेत. यावेळी बोलेरो गाडीचे पूजन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम यांनी केले.
दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली आहे.आपल्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या दत्तात्रयने गाडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस विकून गाडीचे साहित्य आणले. कुटुंबातील सर्वांची साथ मोलाची लाभली. विशेष बाब म्हणजे दत्तात्रय हा शाळाही शिकलेला नाही. परंतु त्याच्या प्रबळ इच्छशक्तीमुळे तो मिनी जिप्सी तयार करू शकला. दत्तात्रय लोहार याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. फॅब्रिकेशनचा त्याचा व्यवसाय आहे. ते कामही त्याने फॅब्रिकेशन दुकानात बघून शिकला आहे.मिनी जिप्सी तयार केल्यामुळे त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
दत्तात्रय लोहार यांच्या मिनी जिप्सीचा व्हिडिओ पाहून आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रय यांनी बनवलेल्या गाडीच्या बदल्यात मी त्यांना बोलेरो गाडी देईन व त्यांची गाडी कंपनीच्या रिसर्च व्हॅली मध्ये प्रदर्शनास ठेवणार असे ट्विट केले होते. यावर दत्तात्रय यांनी महिंद्रा यांची बोलेरोची ऑफर नाकारली अशा अफवा पसरल्या होत्या. परंतु मी बोलरोची वाट पाहतोय अशी बातमी दैनिक सकाळने प्रसिद्ध केली होती.
राज्यमंत्री कदम यांनी मतदार संघातील व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमितील दत्तात्रय लोहार यांचे कौतुक केले. यासाठी कुटुंबातील सर्वानी कष्ट घेतले. दत्तात्रय लोहार यास लागेल ती मदत करण्याचे कदम यांनी सांगितले. तसेच सत्तर हजार रु. धनादेशही त्यांना सुपूर्त केला. दत्तात्रयच्या मिनी जिप्सीतुन कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam)यांनी फेरफटका ही मारला तसेच आनंद महिंद्रा यांचे मानले आभार.
मिनी जिप्सी देशात चर्चेचा विषय झालेला असताना दक्षिण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार सरुताई धडे यांनी मिनी जिप्सीवर गाणं रचले आहे. ‘गाडी पॉम पॉम, गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटार, या गाडीला दत्ताभाऊ डायवर, या गाडीला लोहार डायवर ,गाडी पॉम पॉम,कशी वाजते मोटार,या गाडीला वहिनी डायवर,या गाडीला दत्ता भाऊ डायवर,बाई कडेगाव तालुक्यात हाय देवराष्ट्रे गाव ,यशवंतराव चव्हाण बाई हे देवराष्ट्रे गाव,गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटर, हाताची हाय ही कला महाराष्ट्रात प्रसाद दिला. अशी रचना त्यांनी केली.
साभार सकाळ