चिंता वाढली!! ब्रिटिश कोरोनाचे आणखी 20 रुग्ण ‘पुण्याच्या लॅब’मध्ये सापडले
कोरोना नियंत्रणात येतोय. रुग्णसंख्या कमी होत आहे. मृत्युदर घसरत चालला आहे. आरोग्य यंत्रणाच नव्हे, तर देशातील दीडशे कोटी जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण देशात ब्रिटिश कोरोनाचे आणखी 20 रुग्ण आज सापडले. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठवण्यात आलेल्या संशयित रुग्णांच्या नमुन्यांपैकी 20 पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे टेन्शन आणि धडधड पुन्हा वाढली आहे. ब्रिटिश कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेचीही झोप उडाली आहे.
असे आढळले 58पॉझिटिव्ह रुग्ण
8 नॅशनल सेंटर फॉर, डिजिस कंट्रोल, दिल्ली
1 नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल
3 सेंटर फॉर मॉलिक्युलर बायोलॉजी, हैदराबाद
11 इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स
25 एनआयव्ही, पुणे
10 इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूरोसायन्सेस
शुक्रवारी राज्यभरात ड्राय रन
7 जानेवारीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत आमची व्हिडीओ काॅन्फरन्सिंग होणार असून अनेक मुद्दे मांडणार आहेत. ज्या त्रुटी वाटत आहेत त्याबद्दलदेखील सांगणार आहोत. 8 तारखेला प्रत्येक जिल्हय़ात ड्राय रन करणार असून त्याच्यातून आपली यंत्रणा तपासली जाईल. यामध्ये काही त्रुटी वगैरे आहेत का? पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यात समन्वय आहे का याचीही पाहणी होईल. ज्यावेळी आपण लसीकरणाचा कार्यक्रम राबवू त्यावेळी कोणतीही अडचण न येता कार्यक्रम राबवता यावा यादृष्टीने हे सर्व करणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
ब्रिटनचे पंतप्रधान येणार नाहीत
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला हिंदुस्थान दौरा रद्द केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आले होते. जॉन्सन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि आपण प्रजासत्ताक दिनाला येऊ शकत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
दहा दिवसांत लसीकरण सुरू होणार
देशात येत्या दहा दिवसांत कोरोना लसीकरण सुरू होणार असल्याचे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिले. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने 3 जानेवारी रोजी मंजुरी दिली. अशा मंजुरीनंतर दहा दिवसांत लसीकरण सुरू होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे 13 ते 14 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोविड योद्धय़ांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज असणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.