अनिल देशमुखांकडे कोण गुपित ज्याने पवारांनी आपली भूमिका बदलली ? -मनोज कोटक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. मात्र हे आरोप पुन्हा एकदा आज दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी खोडून काढत देशमुखांची पाठराखण केली.

आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी म्हंटले की, करोनाच्या संसर्गामुळे अनिल देशमुख नागपूरच्या रुग्णालयात ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान दाखल होते. त्यानंतर घरीच विलगीकरणात होते. त्यामुळं सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्यात बैठक झाली असल्याचा दावाच चुकीचा असल्याचे पवार यांनी म्हटले होते. तसेच त्यांच्या राजीनाम्याची गरज नाही असे सुद्धा पवारांनी बोलून दाखविले होते.

आता पवारांच्या या विधानावर भाजपा आक्रमक झालेली असून पवारांच्या या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. “पवार साहेब कालपर्यंत म्हणत होते की गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. आज पवार म्हणतात, की राजीनाम्याची गरज नाही. याचा अर्थ २४ तासांत अनिल देशमुख यांनी असे काय सांगितले, त्यांच्याकडे असं काय गुपित आहे, की शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली?” असा सवाल भाजपाचे खासदार मनोज कोटक यांनी विचारला आहे.

पुढे बोलताना कोटक म्हणाले की, गृहमंत्री देशमुख यांनी १५ फेबुवारीला पत्रकार परिषद घेतली आणि त्याचे पुरावे त्यांच्या ट्विटरवर उपलब्ध आहेत. या गोष्टीचा विपर्यास करण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावर का बोलत नाहीत? कालपर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत होते. आता मुख्यमंत्री का गप्प आहेत? असा सवाल कोटक यांनी उपस्थित केला होता.

Team Global News Marathi: