“अनिल देशमुख हिंदू, मराठा असल्याने लगेच राजीनामा पण नवाब मलिक मुस्लीम…

 

मुंबई : मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची २३ फेब्रुवारी रोजी ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घेतलं जातं, असं म्हटलं होतं. पवार यांच्या याच वक्तव्यावरुन आता भाजपा नेते नितेश राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी अनिल देशमुख प्रकरण आणि नवाब मलिक प्रकरणाची तुलना करत पवारांवर टीका केली.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने अणुशक्तीनगर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अणुशक्तीनगरमधील विधानसभा वॉर्डमधील कार्यकर्ता संमेलनासाठी नितेश राणेही उपस्थित होते. यावेळेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना नवाब मलिक प्रकरणावरुन धार्मिक संदर्भाचा उल्लेख करत प्रश्न विचारला.

तो मुस्लीम कार्यकर्ता आहे म्हणून तो दाऊदच्या संपर्कात आहे. वा बाबा! माननीय पवारसाहेब हे फार मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने त्यांच्याबद्दल बोलता पण कामा नये. पण मी जे बोलतोय ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही, पण या देशाचा एक नागरिक म्हणून मला पवारसाहेबांना विचारायचंय. अहो पवारसाहेब हा दाऊदबरोबर बसणारा उठणार व्यक्ती आहे, जो तुमच्या पक्षाचा नेता, मंत्रीमंडळाचा सदस्य आहे. त्यांचा तुम्ही राजीनामा घेत नाही तर अनिल देशमुखांचा राजीनामा का घेतला? असा प्रश्न देखील उपस्थित केला.

Team Global News Marathi: