‘अनिल देशमुख… हॅप्पी दिवाली! अनिल परब.. मेरी ख्रिसमस??,’

 

मुंबई | १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आरोप असलेले राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल १३ तासांच्या दीर्घ चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाकडून अखेर अटक करण्यात आली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात हजर झाले. त्यामुळे एकच चर्चा राजकीय वर्तुळात होते होती.

तसेच सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. आता अनिल देशमुख यांच्यानंतर पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल, असा दावा भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांनी केला आहे.

 

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणेंनी यासंदर्भात मध्यरात्री ट्विट केली आहेत. ‘अखेर ठाकरे सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. १०० कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार. अनिल देशमुख नंतर अनिल परब,’ असं सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास त्यांनी हे ट्विट केलं आहे.

तसेच भाजप आमदार नितेश राणेंनीदेखील मध्यरात्री २ च्या सुमारास असंच एक ट्विट केलं. ‘अनिल देशमुख… हॅप्पी दिवाली! अनिल परब.. मेरी ख्रिसमस??,’ असं सूचक ट्विट राणेंनी केलं आहे. ‘नवाब मलिक आणि संजय राऊतांचे विशेष आभार’, असंही राणेंनी त्यांच्या ट्विटमध्ये खोचकपणे नमूद केलं आहे. देशमुख यांच्या अटकेनंतर अवघ्या काही मिनिटांनंतर राणे आणि सोमय्या यांनी ट्विट केली आहेत.

Team Global News Marathi: