अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली

 

राज्यातल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार असून त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करत या दोघांनी कोर्टात अर्ज केला होता. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही कोठडीत आहेत.

कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत असून हक्काची दोन मतं गमवावी लागण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयावर आपण उच्च न्यायलयात अपील करणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. येत्या 10 जूनला होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह मविआला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे.

मविआचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तर नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता यावं यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आपल्याला मतदान करता यावं यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात अर्ज केला होता. आता त्यांना मतदान करता येणार नाही असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

Team Global News Marathi: