अमेरिकेत व्याजदर वाढीने, भारतात बाजार उघडताच सेन्सेक्स कोसळला!

 

अमेरिकेत महागाईच्या दरात अंदाजीत आकडेवारीपेक्षाही अधिक वाढ झाल्यामुळे आता फेडरल रिझर्व्ह बँकेकडून या आठवड्यात पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याचेच परिणाम जगभरातील गुंतवणुकीवरही पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारात पडझड होत असून भारतीय शेअर बाजारातही याचे पडसाद पाहायला मिळत आहेत.

अशातच सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारावर दबाव आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्हींची सुरुवात पडझडीनं झाली आहे. शेअर बाजारात आज प्री-ओपन सेशनमध्येच घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास १०० अंकांच्या घसरणीसह ५८,७५० अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी प्री-ओपन सेशनमध्ये १७,५४० अंकांवर जवळपास एकदम फ्लॅट व्यवहार करत होता.

दुसरीकडे सिंगापूरमध्ये एसजीएक्स निफ्टीचा फ्यूचर कान्ट्रॅक्ट सकाळी ९ वाजता ६.५ अंकांचा किरकोळ वाढीसह १७,५६९.५ अंकांवर व्यवहार करताना पाहायला मिळाला. हे आकडे पाहता आज भारतीय बाजारावरही काही प्रमाणात दबाव पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सेन्सेक्स जवळपास २४० अंकांच्या घसरणीसह ५८,६०० अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी जवळपास ६५ अंकांच्या घसरणीसह १७,४७० अंकांवर व्यवहार करत होता.

Team Global News Marathi: