अंधेरीत जनसंपर्क कार्यालय भाड्याने घेण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद

 

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून तत्पूर्वी या मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी येथील पंप हाऊसजवळ अंबिका टॉवरमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यावरुन शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यामुळे इथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल हे या पोटनिवडणुकीतील संभाव्य उमेदवार आहेत. त्यांनी अंबिका टॉवरमधील तळमजल्यावर जनसंपर्क कार्यालय भाड्याने विकासकाकडून घेतले होते तर शिवसेनेने देखील हेच कार्यालय एजंटच्या मार्फत घेतले. मात्र यामुळे वाद निर्माण झाला होता. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे एकमेकांना भिडले होते. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करुन हा वाद मिटवला आहे. सध्या या कार्यालयाजवळ शांतता असली तरी मात्र इथले वातावरण तणावाचे बनलेले आहे.

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपने आपल्याकडे घेऊन पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे संभाव्य उमेदवार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आता ही जागा भाजपने आपल्या घेतल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

Team Global News Marathi: