आनंद वार्ता : करोनाच्या मल्टीपल व्हेरियंट आणि डबल म्युटेंट स्ट्रेनवरही कोवॅक्सिन प्रभावी, ICMR चा दावा

नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने लसीकरण मोहीमेला आणखी वेग दिला आहे. कारण करोनाविरोधी लढाईत सर्वात मोठं आणि महत्त्वाचं शस्त्र म्हणजे लस असल्याचं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. आता लसीच्या मुद्द्यावर आपल्या सर्वांसाठी आयसीएमआरने ( ICMR ) चांगली बातमी दिली आहे. यामुळे देशाला करोनाच्या या संकटात काहिसा दिलासा मिळाला आहे. करोना व्हायरसच्या मल्टीपल व्हेरियंट आणि डबल म्युटेंट स्ट्रेनवर करोनावरील स्वदेशी लस कोवॅक्सिन  प्रभावी ठरली आहे, असा दावा आयसीएमआरने केला आहे.

करोनाचा डबल म्युटेंट स्ट्रेन आणि मल्टीपल व्हेरियंटवर भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेली कोवॅक्सिन लस प्रभावी असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे. आयसीएमआरने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे. आयसीएमआरने यासंदर्भात ट्वीट केलं आहे. SARS-CoV-2 च्या मल्टी व्हेरियंट आणि डबल म्युटेंट स्ट्रेनविरोधात कोवॅक्सिन लस प्रभावी ठरली आहे, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. देशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना सरकारने लसीकरण मोहीमेवर जोर दिला आहे. अशा स्थितीत ही एक दिलासा देणारी बातमी आहे.

कोवॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. केंद्र सरकारची संस्था आयसीएमआर आणि हैदराबादमधील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस विकासित करण्यात आली आहे. येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरणासाठी भारत बायोटेक पुढच्या महिन्यात कोवॅक्सिन लसीचे तीन कोटी डोसचे उत्पादन करणार आहे. मार्चमध्ये कंपनीने १.५ कोटी डोसचे उत्पादन केले होते. यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकला आर्थिक पाठबळही दिले आहे. तसंच उत्पादन वाढवण्याच्या सूचनाही केंद्र सरकारने लस उत्पादक भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटला दिल्या आहेत.

भारत बायोटेक बेंगळुरूत नवीन यंत्रणा उभारणार आहे. कंपनीने सुरवातीला एका प्रकल्पाद्वारे उत्पादन सुरू केले होते. आता हैदराबादमध्ये कंपनीने चार प्रकल्प उभारले आहेत. त्यातून लसीचे उत्पादन सुरू आहे. गेल्या महिन्यात आम्ही दीड कोटो डोसचे उत्पादन केले होते. या महिन्यात दोन कोटी डोसचे उत्पादन करणार आहोत. पुढच्या महिन्यात हे लक्ष्य तीन कोटी डोसचे आहे. यानंतर सात ते साडेसात कोटी डोसच्या उत्पादन केले जाईल, अशी माहिती भारत बायोटेकच्या एल्ला यांनी एका कार्यक्रमात दिली.

आकडेवारीनुसार देशात जवळपास १३ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं. यापैकी पहिला डोस घेणाऱ्या १०,०३,०२,७४५ लोकांपैकी केवळ १७,१४५ लोकांनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगण्यात आलं. हे एकूण संख्येच्या ०.०२ टक्के इतकं आहे. तर कोविशिल्डचा दुसरा डोस घेणाऱ्या १,५७,३२,७५४ लोकांपैकी ५,०१४ लोकांना ब्रेक थ्रू इनफेक्शन झालं. जे एकूण आकडेवारीच्या ०.०३ टक्के इतकं आहे.

१.१ कोटी लोकांना कोवॅक्सिन 

आतापर्यंत १.१ कोटी लोकांना कोवॅक्सिनचा डोस देण्यात आला. यात पहिला डोस घेणाऱ्या ९३,५६,४३६ लोकांपैकी  ४,२०८ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. जे एकूण संख्येच्या ०.०४ टक्के इतकं आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्या १७,३७,१७८ लोकांपैकी केवळ ६९५ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. जे एकूण संख्येच्या ०.०४ टक्के आहे.

एकूण संख्येचा विचार केला तर भारतात १०,९६.५९.१८१ लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यानपैकी आतापर्यंत २१,३५३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ही संख्या एकूण संख्येच्या ०.०२ टक्के आहे. म्हणजेच १० हजार जणांपैकी २ जणांना कोरोनाची लागण झाली. तर देशात १,७४६९,९३२ लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. यापैकी ५,७०९ लोकांना कोरोनाची बाधा झाली. याचाच अर्थ १० हजार जणांमधून तीन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला.

गंभीर संसर्गापासून रक्षण

“लस तुम्हाला गंभीर आजार होण्यापासून वाचवते. परंतु ती संक्रमण होण्यापासून वाचवणार नाही असंही होण्याची शक्यता आहे. लसीकरणानंतरही पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊ शकतात. यासाठी लसीकरणानंतरही मास्क परिधान करणं आवश्यक आहे. आपण काय तयारी केली आणि कुठे चूक झाली हे पाहण्याची ही वेळ नाही. एकत्र येईल या महासाथीचा सामना करण्याची ही वेळ आहे,” असं मत एम्सचे अध्यक्ष रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: