आनंद दिघे यांना टाडा लागला तरी, ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत, एकनाथ शिंदेंना टोला

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केल्यापासून, राज्यात शिंदे गटाविरूद्ध ठाकरे गट झाला आहे. अशातच काल स्व.आनंद दिघे यांची पुण्यतिथी होती. त्यावेळी हे दोन्ही गट आमने-सामने आले होते. त्याठिकाणीही त्यांनी एकमेकांवर टीका केली असल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच शिवसेना पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

स्व. आनंद दिघे यांना टाडा लागला. अडीच वर्षे त्यांनी तुरुंगात काढली, परंतु ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत. गद्दारांना क्षमा नाही या विधानातून त्यांनी माघार घेतली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसेनेसाठीच झटत होते. त्यामुळे दिघेसाहेबांची जागा कोणीही घेऊ शकत नसल्याचं म्हणत राजन विचारे यांनी शिंदे गटावर हल्ला केला आहे.

स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खारकर आळीतील शक्तिस्थळावर दिघे यांना अभिवादन केल्यानंतर राजन विचारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच आम्ही ओरिजनल आहोत आणि आमचीच शिवसेना खरी आहे, असंही विचारे यांनी सांगितलं आहे. तसेच आनंद दिघे गेलेले नाहीत, ते आजही आपल्यात आहेत आणि सर्व बघत आहेत. त्यामुळे येत्या काळात ज्यांनी गद्दारी केली त्यांना तेच शिक्षा देतील. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा कोण पुढे नेतो हे आगामी निवडणुकीत जनताच दाखवेल.

Team Global News Marathi: