मंगळवारी मनसेची महत्वाची बैठक, मनपा निवडणुकीची ठरणार रणनीती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सध्या कृष्णकुंजवर बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. सध्या स्थानिक पातळीवर सुरू असलेली विविध आंदोलने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.
या बैठकीत आपापल्या भागातील राजकीय स्थिती मांडण्याच्या सूचनाही पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्या आहेत. कोरोनाची गंभीर परिस्थिती हळू-हळू सुधारत असताना राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.
लवकरच राज्यातील विविध महापालिका निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. तर, वर्षभरावर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात मनसेनेही संघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष दिले आहे. गेल्या काही काळापासून कृष्णकुंजवर पक्षाच्या विविध आघाड्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.
राज्याच्या विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील घडामोडींचा आढावा घेतला जात आहे. आता मंगळवारी मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका, त्यासाठी पक्ष संघटनेची सद्य:स्थिती, तयारी, राजकीय-सामाजिक समीकरणे आदींबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.