अमरावतीत दूषित पाण्याचे ३ बळी; अनेकांची प्रकृती बिघडली, नवनीत राणा आक्रमक

 

अमरावतीतील दूषित पाण्याचा मुद्दा गाजत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची दखल घेतली. शिंदे यांनी तातडीनं अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावतीत मेळघाटच्या पाचडोंगरी भागात दूषित पाणी प्यायल्यामुळे ३ जणांना जीव गमवावा लागला. तर 70 ते 80 जणांवर उपचार सुरु आहेत. माझानं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर प्रशासन जागं झालं आणि मुख्यमंत्र्यांनीही दखल घेतली. ज्यांना या दूषित पाणी प्यायल्यामुळं जीव गमावावा लागला आहे त्यांच्या परिवाराला मदतीचे आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.

मेळघाटात दूषित पाण्याने तिघांचा मृत्यू तर ७० ते ८० जणांची प्रकृती बिघडली आहे. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरीमध्ये दूषित पाणी पिल्याने कॉलरा सदृश्य आजारामुळे साथ आली आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तिथं पोहोचल्या. यावेळी खासदार नवनीत राणांसह जिल्हा परिषदचे सीइओ, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी हजर होते.

नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, गावात अतिशय भीषण परिस्थिती आहे, गावाबाहेरच्या विहिरीतील घाण पाणी पिल्याने लोकं आजारी पडले आहेत. त्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचा वीज पुरवठा कापल्याने ही परिस्थिती ओढवली. मागील सरकारने आदेश दिल्याने वीज पुरवठा 15 दिवस आधी कापण्यात आला.

मात्र ज्या विभागाच्या चुकीमुळे ही घटना घडली त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. उघड्या विहिरीवरून हे लोक अस्वच्छ पाणी भरत होते तेव्हा प्रशासन काय करत होते याचं उत्तर द्यावे लागेल. वीज विभागाने पूर्वसूचना न देता वीज कापली, इतकी मोठी घटना घडूनही संबंधित विभागाचे अधिकारी वेळेवर पोहोचले नाहीत, असं राणा यांनी म्हटलं होतं.

Team Global News Marathi: