”अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार, आरोप झाला की ते बाहेर काढू”

 

विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्टिंग ऑपरेशन असलेले पेन ड्राईव्ह सादर केले आणि कशाप्रकारे विरोधी पक्षाच्या नेत्यांना विनाकारण एखाद्या प्रकारात अडकवण्याचा कट रचला जात आहे त्याचे पुरावे दिले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या आरोपांनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली.

फडणवीसांच्या आरोपानंतर पुन्हा एकदा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये सत्यता आहे, अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तिकडून एखादा आरोप झाला की आम्ही पुढचे पेनड्राईव्ह बाहेर काढू, असा इशाराही रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.

तसेच पेन ड्राईव्हमध्ये सत्यता नव्हती तर मग ऍड प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला? असा सवालही रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे. पेनड्राईव्ह मध्ये सत्यता आहे. म्हणूनच त्याची चौकशीची मागणी आम्ही केली आहे. त्यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला. हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह केला.

Team Global News Marathi: