अजित पवार पुन्हा बंडखोरीच्या तयारीत ? भर अधिवेशातून निघून गेले

दिल्ली : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांचे नाराजीनाट्य राज्याला काही नवीन नाही. राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या कुरबुरी सातत्याने चालूच असतात. याच नाराजीचा एक नवीन अंक नुकताच बघायला मिळाला. राष्ट्रवादीचे ८वे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. या अधिवेशन प्रसंगी, भाषणाची संधी दिली नसल्याचा राग येऊन अजित पवार चक्क अधिवेशन सुरु असलेले सभागृह सोडून बाहेर पडले. अधिवेशनात अजित पवार सोडून इतर सर्वांनाच म्हणजे अगदी जयंत पाटील यांनाही भाषणाची संधी दिली गेली होती पण अजित पवारांचे नावाच त्यात नव्हते.

अधिवेशनात सर्वांचीच भाषणे चालू होती. सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ या सगळ्याच नेत्यांची भाषणे चालू होती. अजित पवार नुसतेच मंचावर बसून होते. त्यांचे नाव काही येत नव्हते. शेवटी जयंत पाटील यांचेही भाषण झाले पण अजित पवार यांचे नाव आले नाही. शेवटी चिडून अजित पवार सभागृह सोडूनच गेले. जयंत पाटील यांच्या भाषणानंतर त्यांचे नाव पुकारण्यात आले पण त्यावेळी अजित पवार सभागृहतच नव्हते. शेवटी सुप्रिया ताईंनी धावत जाऊन त्यांची समजूत घातली जेव्हा कुठे अजित पवार परत आले पण तोपर्यंत कार्यक्रम संपत आला होता.

यावेळी सारवासारव करत अजित पवारांनी हा राष्ट्रीय कार्यक्रम होता त्यामुळे बोललो नाही असे स्पष्टीकरण दिले. “देशभरातून अनेक नेते येथे आले होते. त्यातील महाराष्ट्रातील छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे अशा नेत्यांनी भाषणे केले. त्याचबरोबर केरळमधील आणि लक्षद्वीप येथील खासदाराने भाषण केले.

अशा अनेक नेत्यांनी आपले मत मांडले आणि हे काय फक्त महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अधिवेशन नव्हते, हे राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे मी भाषणाबद्दल काही बोललो नाही” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. जरी हे प्रकरण सध्या शांत केले गेले असले तरी त्यातून राष्ट्रवादीची ठिगळे दिसून आली हे मात्र नक्की.

ग्लोबल न्युज नेटवर्क: