अजित पवारांचे राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावर सडेतोड वक्तव्य

 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगलेच वाद झाले होते तसेच राज्यपालांची राज्यातील कारकीर्द सुरूवातीपासूनच वादग्रस्त स्वरूपाची आहे. त्यानंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपालांनी सरकारबाबत विधान न करता मुंबई, ठाण्याबाबत विधान करत वाद ओढवून घेतला आहे.

मुंबई आणि ठाण्यासारख्या भागांमधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना वेगळं केल्यास या शहरांकडे पैसेच राहणार नाही आणि मग मुंबईला आर्थिक राजधानीही म्हणता येणार नाही, अशा आशयाचं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. राज्यपालांच्या या विधानावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी दोन ट्वीट करून कोश्यारी यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच, मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसाचाच मोठा वाटा आहे, असं ठणकावून सांगितले. “मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये. ।। महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे… खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा ।।”, असे ट्वीट करत अजितदादांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली.

Team Global News Marathi: