‘आदित्य ठाकरें यांच्या दौऱ्यावर आमदार नितेश राणे यांचा टोला’

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि राणे कुटुंबिय ठाकरे सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत अशातच राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे कोकणातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मंत्री झाल्यापासून गेल्या अडीच वर्षात आदित्य ठाकरे यांना सिंधुदुर्ग आणि कोकणाची आठवण झाली नाही. मग आज ते भावाला देण्यासाठी नवीन खेकडा सापडतोय का, हे पाहायला सिंधुदुर्गात येत आहेत का, असा खोचक सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित करत पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे.

राणे म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोकण हा शिवसेनेचा कणा असल्याचे सांगायचे. मग आदित्य ठाकरे यांना अडीच वर्षांनी कोकणाची आठवण कशी आली? करोनाच्या काळात पर्यटनाचे केंद्र असलेल्या सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंग आणि इतर व्यवसाय करणाऱ्यांचे हाल झाले. तेव्हा राज्य सरकारने या व्यावसायिकांना कोणतीही मदत केली नाही. मग आदित्य ठाकरे आता फक्त फोटो काढायला आणि फिरायला येत आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता

तसेच पुढे बोलताना राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे अर्थमंत्र्यांच्या गाडीत बसून फिरतात. मग त्यांनी सिंधुदुर्गातील व्यावसायिकांसाठी एखादे आर्थिक पॅकेज तरी जाहीर करावे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. ते सोमवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला कोकणातील शिवसेनेचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: