आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत पुन्हा एकदा डिवचल

 

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर होत असलेल्या पहिल्याच अधिवेशनात शिवसेनेतील दोन गटांमध्ये जोरदार शीतयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदं मिळाली आहेत. मात्र, पहिल्याच अधिवेशनात त्यांना उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार विरोधाचा सामना करावा लागण्याची चिन्हं दिसत आहेत.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशीरा एक ट्विट करून त्याचे संकेत दिले. या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या आमदारांवर बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आता विधानसभेत शिवसेनेतील दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा ‘गद्दार’ म्हणून डिवचले आहे. काही गद्दार आमदारांची भाषा ऐकून, प्रश्न पडतो की गुंडगिरी आणि सत्तेची नशा एवढी आहे का, की त्यांच्या नव्या पक्षाचा आणि सरकारचा अंकुश नाही? जनतेला अशा भाषेत धमकावून काय सांगायचं आहे? हा सत्तेचा माज आहे की, काही न मिळाल्याचे नैराश्य?, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या आमदारांवर तुटून पडणार का, हे पाहावे लागेल.

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून वातावरण तापवले होते. शिवसंवाद यात्रेतील आदित्य ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी होताना दिसत होती. परंतु, मध्यंतरी आदित्य ठाकरे आजारी पडल्यामुळे त्यांच्या शिवसंवाद यात्रेत खंड पडला होता. मात्र, आता आदित्य ठाकरे यांची प्रकृती सुधारली असून ते पुन्हा एकदा दौऱ्यांना सुरुवात करणार आहेत.

Team Global News Marathi: