खुनाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी गजाआड

खुनाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी गजाआड

पानटपरीच्या गल्ल्यातून पैसे चोरी केल्याच्या संशयातून तरुणाची हत्या

ठाणे- डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे अन्वेषण विभागावाच्या युनिट ३च्या पथकाने दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून एक आरोपी फरार झाला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत त्यांनी २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एका सहकार्याची हत्या करून मृतदेह गोणीत भरून तलावात फेकल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. पानटपरीच्या गल्ल्यातील पैसे चोरी करीत असल्याच्या संशयावरून तिघांनी मिळून १८ वर्षाच्या सूरीज पाल या तरुणाची हत्या केल्याचे उघडकिस आल्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

सुरीज पाल (१८) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सुरीज पाल हा मूळचा उत्तरप्रदेश बांदा जिल्हयातील एका खेड्यात राहण्यास होता. सुरीज पाल आणि इतर दोघे असे एकूण तिघे जण पोटाचीखळगी भरण्यासाठी डोंबिवलीत आले होते. डोंबिवली मानपाड्यातील पांडुरंग वझे कंपाउंड येथे राहणारा सुनील पटेल यांच्याकडे राहण्यास आले होते. सुनील पटेल हा घराजवळच असणाऱ्या क्लासिक हॉटेलच्या शेजारी असणारी पानटपरी चालवत होता. सुनीलने या तिघांपैकी सुरीज पाल याला पानटपरीवर कामावर ठेवले होते. व इतर मजुरीचे काम करून सुनील पटेल सोबतच पांडुरंग वझे कंपाउंड येथे राहत होते. २०ऑगस्ट रोजी रात्री सुनील आणि सुरीज पाल यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते, तेव्हा पासून सुरीज पाल हा बेपत्ता असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभाग युनिट ३चे पोलीस अमंलदार राजेंद्रकुमार खिल्लारे यांना मिळाली. खिल्लारे यांनी युनिट ३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना याबाबत कळवले असता बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने सुनील पटेल याला संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गुन्हे शाखेच्या पथकाने कसून चौकशी केली असता त्याने सुरीज पाल याची तिघांनी मिळून हत्या केली आणि मृतदेह गोणीत भरून क्लासिक हॉटेलच्या मागे असणाऱ्या तलावात फेकल्याची कबुली दिली.

मृत सुरीज पाल हा महिन्याभरापूर्वी सुनील पटेल कडे कामासाठी आला होता, लॉकडाऊन सुनील हा हॉटेल क्लासिक येथील पानटपरी उघडून तंबाखू, गुटखा आणि सिगारेट विकत होता या टपरीवर त्याने सुरीज पाल याला कामावर ठेवले होते. गेल्या काही दिवसापासून पानटपरीतील गल्ल्यातून पैसे चोरीला जाऊ लागल्यामुळे सुनीलने इतर दोघा सहकाऱ्याकडे चौकशी केली असता सुरीज हा गल्ल्यातील पैसे चोरी करीत असल्याचे दोघांनी सुनीलला सांगितले. २० ऑगस्ट रोजी सुनील आणि सूरीज या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि सुनील आणि इतर दोघं सहकाऱ्यानी सुरीजला मारहाण केली होती. या मारहाणीनंतर घरमालकाने सर्वाना दम दिला. त्या नंतर सुनील हा पांडुरंग वझे कंपाउंड येथील खोलीवर सुरीज पाल आणि इतर दोघाना घेऊन आला. २१ ऑगस्ट रोजी मद्यरात्री पुन्हा त्याच्यात भांडण होऊन सुनील आणि इतर दोघे असे तिघांनी मिळून सूरीजला गॅस पाईप, कमरेच्या पट्ट्यांची मारहाण करून त्याचे डोके भिंतीवर आदळून त्याची हत्या केली. सुरीज हा मृत झाल्याचे बघून तिघांनी मृतदेहासोबतच रात्र काढली आणि सकाळी उठून तिघांनी सुरीज पाल याचा मृतदेह एका गोणीत भरून मृतदेह क्लासिक हॉटेलच्या मागे असलेल्या तलावात फेकून दिला अशी कबुली सुनील पटेल यांनी पोलिसांना दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली.

गुन्हे अन्वेषण विभाग युनिट ३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. भूषण दायमा, पोउनि. नितीन मुद्गुण, पो.ह. भोसले, राजेंद्रकुमार खिल्लारे, अजित राजपूत, शिर्के, निकुळे, बंगारा, पाटील आणि ईशी या पथकाने या गुन्हयाचा तपास कौशल्याने करून दुसरा अल्पवयीन आरोपीला अटक केली असून तिसरा आरोपी फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी क्लासिक तलाव येथून सुरीज पाल याचा मृतदेह ताब्यात घेऊन पूर्वतपासणीसाठी रुख्मिणीबाई रुग्णालय येथे पाठवण्यात आला असल्याची माहिती सपोआ (गुन्हे) किसन गवळी यांनी दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: