आता बोला! शिवसेना फोडणे मिशन होते, भाजपने मत बाद करण्यासाठी ५-१० कोटींचे गंगास्नान घडवले”

 

शिवसेना फोडणे हे भाजपचे ‘मिशन’ होते व ते पूर्ण झाल्याचा आनंद गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. शिवसेनेसारखा पक्ष फोडणे कठीण होते; पण आम्ही तो फोडला, असेही महाजन म्हणाले. जळगावात ज्या व्यासपीठावर महाजन यांनी हे सत्यकथन केले त्या व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. शिंदे यांनी एक प्रकारे महाजन यांच्या विधानाचे समर्थन केले. ‘महाराष्ट्रातील सत्तांतर सहज घडले नाही व त्यामागे भाजपचे कठोर परिश्रम होते. अखेर मिशन यशस्वी झाले,’ असे महाजन म्हणाले. यावरुन शिवसेनेने भाजपवर सडकून टीका केली आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर फडणवीस वगैरे लोकांनी हात वर केले व या फुटीशी आमचा संबंध नसून ही शिवसेनेची अंतर्गत बंडाळी असल्याचे सांगितले. मात्र गिरीश महाजन यांनी आता हा दावा खोटा ठरवला. भाजपचे शिवसेना फोडण्याचे मिशन होते म्हणून सध्याचे सरकार बनविण्यात आले. भाजप म्हणे गंगेसारखा आहे. त्यात डुबकी मारा आणि पापं धुऊन टाका, अशी ऑफर त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी दिलीच आहे. महाराष्ट्रातील फुटिरांच्या घरापर्यंत ‘गंगा’ नेण्याचे काम भाजपने केले, अशी घणाघाती टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे.

शरद पवार यांनी कारस्थान करून शिवसेना फोडली असे बेइमान गटाचे आमदार बोलत होते. चाळीस आमदार व त्यांचे नेते हे स्वतःच विक्रीसाठी बाजारात उभे होते. भाजपने बोली लावली व ते फुटले. शिंदे व त्यांच्याबरोबरचा गट हा बऱ्याच काळापासून फुटण्याच्या तयारीत होता व उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा मुहूर्त त्यांनी पकडला. बाकी सर्व भाजपने ठरवल्याप्रमाणे केले. शिवसेना फोडायचीच हे भाजपने ठरवूनच टाकले होते व त्या पद्धतीने सापळा रचला. भाजपला महाराष्ट्र फोडायचा आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत, असा दावाही शिवसेनेने केला आहे.

Team Global News Marathi: