आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यसभा निवडणूक, कोरोना, ‘मास्कसक्ती’वर होणार चर्चा

 

राज्यात रविवारी १ हजार ४९४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून सातत्याने दैनंदिन वाढ होत असल्याचे सक्रिय रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन केलं आहे. तसेच आज या मुद्द्यावर सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आज दुपारी ४ वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, मास्कसक्ती आणि आगामी राज्यसभेची निवडणुक या विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अपक्ष आमदारांशी देखील संवाद साधणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनं मतदान करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंकडून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. या निवडणुकीत भाजपाचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. तर भाजपाचा तिसरा आणि शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारामध्ये सहाव्या जागेसाठी चुरस आहे. निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला ४२ मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांकडे नसल्याने छोटे पक्ष अपक्षांवर त्यांची मदार आहे.

Team Global News Marathi: