सातारच्या पत्रकारिता क्षेत्रातील चमकता तारा निखळला ; मोहन मस्कर पाटील यांचे निधन

सातारच्या पत्रकारिता क्षेत्रातील चमकता तारा निखळला ; मोहन मस्कर पाटील यांचे निधन

सातारा: सातारा येथील धडाडीचे पत्रकार व दैनिक पुण्यनगरीच्या सातारा आवृत्तीचे उपसंपादक मोहन मारुती मस्कर – पाटील (वय ४२) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, बहिण, पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.

मोहन मस्कर – पाटील यांना आज सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्रास वाढल्यामुळे त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तथापि, उपचारादरम्यान दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त सर्वत्र वाऱ्यासारखे पसरले आणि पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली. त्यांच्या अकाली निधनाचा सर्वांनाच मोठा धक्का बसला. रुग्णालयातून त्यांचे पार्थिव त्यांच्या सातारा येथील निवासस्थानी काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

राजकीय विषयावर विपुल लेखन

मूळचे चिंचेवाडी (ता. शिराळा, जि. सांगली) येथील असलेल्या मोहन मस्कर – पाटील यांची पत्रकारितेतील कारकीर्द खऱ्या अर्थाने साताऱ्यात बहरली. मोहन मस्कर यांनी लेखणीच्या माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडण्याचे काम तळमळीने केले. विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. राजकीय विषयावर लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता.  नकुसा, एडस् या विषयापासून डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या विवेकवादी, चिकित्सावादी, विज्ञानवादी साहित्य मूल्यांविषयी त्यांनी सातत्याने लेखन केले.

विविध पुरस्कारांनी गौरव

त्यांच्या नावावर एनएफआय, युनिसेफ – हर्ड, पॉप्युलशन फर्स्ट, सीएसई, रिच, अनिल अगरवाल तसेच अनेक माध्यम शिष्यवृत्ती आणि महाराष्ट्र सरकारचे पाच पुरस्कार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: