पुण्यात महिला पोलीस निरीक्षकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
ग्लोबल न्यूज – पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस निरीक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शिल्पा चव्हाण असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा चव्हाण या शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा विभाग तसेच एमओबी या दोन ब्रँचचा पदभार होता. आज सकाळी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांना आणण्यासाठी घरी गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळावर हजर आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले आहे.
शिल्पा चव्हाण यांची शांत आणि संयमी अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख होती. त्यांना एक मुलगा असून, तो गावी गेला होता. त्या घरी एकट्याच असल्याचे सांगण्यात आले आहे. धाडसी कारवायामुळे त्या सतत चर्चेत असत. परंतु, अचानक झालेल्या या घटनेने पुणे शहर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.