तरुणीचा विनयभंग करणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

ग्लोबल न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत काम करणाऱ्या एका पोलीस निरीक्षकावर विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस उपनिरीक्षक आणि मद्यपान केल्यानंतर एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एकवीस वर्षीय तरुणीने याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सदर पोलीस उपनिरीक्षक हे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत नेमणुकीस आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक केली होती. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आली होती. चतु:शृंगी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल आहे. याच गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांची आणि संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची ओळख झाली होती. त्यानंतर ते पार्टीसाठी एकत्र भेटले होते. याच वेळी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने तरुणीचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. चतु:शृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: