मुंबईला पुराचा धोका

मुंबई – पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला तरीही मुंबईची नालेसफाई योग्य प्रकारे झालेली नाही. नालेसफाईबाबत कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईला पुराचा धोका आहे. त्यात भरीस भर म्हणून वाढलेल्या अतिक्रमणांनी नाल्यांना गिळले असून त्यांचे प्रवाह रोखले गेले आहेत. रस्त्यातील चर, पर्जन्य जलवाहिन्यांची अपुरी कामे, मेट्रो-मोनोची सुरू असलेली कामे आदींमुळे पावसाचे पाणी दोनशेहून अधिक ठिकाणी भरण्याची दाट शक्‍यता आहे. 

मुंबईत 2017 मध्ये 225 पाणी भरण्याची ठिकाणे आढळली होती. त्यापैकी 120 ठिकाणी केलेल्या कामामुळे गेल्या वर्षीच्या पावसात पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. दोन वर्षांत पाणी साचणारी अजून 48 नवीन ठिकाणे तयार झाल्याचे प्रशासनाने कबूल केले आहे. यंदा नाल्यांच्या कामाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. गेले काही महिने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत गेल्यामुळे नालेसफाईच्या कामावर नियंत्रण राहिलेले नाही. नेमक्‍या त्याच संधीचा फायदा घेत कंत्राटदारांनी नालेसफाईच्या कामाला हरताळ फासल्याचे “सकाळ’ने केलेल्या “रिऍलिटी चेक’मध्ये दिसून आले. मोठे नाले 252 किलोमीटरचे आहेत. त्यापैकी 40 टक्के नाले साफ झाले आहेत. छोट्या 420 किलोमीटर नाल्यांची सफाई करण्याची जबाबदारी विभागवार संस्थांना देण्यात आली आहे. मात्र, संस्थांकडे कामगारांचा तुटवडा असल्याने विभागस्तरावरील छोटे नाले साफ झालेले नाहीत. शहर भागात मोठे नाले 30 किलोमीटर लांब आहेत. त्यापैकी बहुतांश बंदिस्त आहेत. त्यांच्या सफाईकडेही कंत्राटदारांचे दुर्लक्ष झाल्याचा फटका पावसाळ्यात बसण्याची शक्‍यता आहे. खोदलेले चर योग्यरित्या बुजविण्यात आलेले नाहीत. मोनो-मेट्रोची कामे अपूर्ण आहेत. अतिक्रमणांनी नाल्यांचे मार्ग रोखले आहेत. त्याचा फटका पावसाळ्यात बसणार आहे. पाणी तुंबू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे वेगाने पूर्ण करा, असे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. 

admin: