बेसमेंटमध्ये सापडले तब्बल 650 लॉकर्स, कोट्यवधी रुपये जप्त; माजी IPS अधिकाऱ्याच्या घरावर IT चा छापा

माजी IPS अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड; छापेमारीत बेसमेंटमध्ये सापडले तब्बल ६५० लॉकर्स, कोट्यवधी रुपये जप्त

नोएडा येथील सेक्टर-५० मध्ये राहणाऱ्या माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू होती. या छापेमारीत आतापर्यंत खासगी बेनामी लॉकरमधून ३ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

घराच्या तळघरात बांधलेल्या या खासगी लॉकर्सपैकी एका लॉकरमध्ये सुमारे दोन कोटी रुपये आणि उर्वरित दोन लॉकरमधील ३० ते ३५ लाख रुपये आयकर विभागाच्या पथकाने जप्त केले आहेत.

हे तिन्ही लॉकर सोमवारी रात्री उशिरा तोडण्यात आले असून, आणखी दोन संशयास्पद लॉकर लवकरच फोडले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर-५० येथील या घरात आर.एन. सिंह यांचा मुलगा सुयश आणि त्याचे कुटुंबीय राहतात. माजी आयपीएस अधिकारी आणि त्यांची पत्नी मिर्झापूर येथे राहतात. आयकर विभागाच्या पथकाने माजी आयपीएस अधिकारी आर.एन. सिंह यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड ठेवल्याच्या माहितीच्या आधारे शनिवारी छापा टाकला होता.

जेव्हा आयकर पथक घराच्या आत पोहोचले तेव्हा तळघरात सुमारे ६०० खाजगी लॉकर सापडले. हे लॉकर्स इतर लोकांचे असल्याचे सांगितले जात आहे. हे लॉकर्स इतरांना भाड्याने देण्यात आले होते. प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी त्या लोकांशी संपर्क साधला, परंतु ते पुढे येण्यास टाळाटाळ करत आहेत. आयकर विभागाचा तपास आता बेनामी लॉकरकडे सरकला आहे. जप्त केलेली रक्कम सरकारी खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती मिळत आहे.

माजी आयपीएस आरएन सिंग म्हणाले, “माझा मुलगा लॉकर भाड्याने देतो, बँका देतात, बँकांपेक्षा जास्त सुविधा देतो, यामध्ये आमच्याकडे दोन लॉकर्स खासगी आहेत, आतमध्ये चौकशी सुरू आहे, जवळपास सर्व लॉकर्स तपासले आहेत, आमच्याकडे सर्व तपशील आहेत. घरातील काही दागिने टीमला मिळाले आहेत. तसेच लॉकर्समध्ये जे काही सापडले आहे त्याची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत.” यासंदर्भात आज तकनं वृत्त दिलंय.

माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावर खासगी लॉकर भाड्याने देण्याचे काम केले जात असल्याचे सांगण्यात आले. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असल्याचं म्हटलं गेलंय. आयपीएस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय तपासात सहकार्य करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घराच्या खाली अशा पद्धतीने बेसमेंटमध्ये लॉकर बनवून त्यामध्ये कोट्यवधी रुपये नेमके कसे ठेवले त्याला कोणी परवानगी दिली या सगळ्याची आता सखोल चौकशी केली जाणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: