पावसाळ्यात पोह्यांचा चिवडा सादळू नये म्हणून ५ टिप्स, करा पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा

पावसाळ्यात पोह्यांचा चिवडा सादळू नये म्हणून ५ टिप्स, करा पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा

पावसाळ्यात चहासोबत मस्त चिवडा खायला आवडतो. त्यातही आता सणावारांचे दिवस, घरी पाहूणे येतात.
पटकन डिशभर चिवडा चहा असं आदरातिथ्य करता येतं. पण मूळ प्रश्नही तिथंच असतो.
पावसाळ्यात पोह्यांचा चिवडा करायचा म्हंटलं की सादळण्याची, वातड-चामट हाेण्याची भीती वाटते.
पोहे भाजताना चुकलं की ते आकसतात. पोह्याच्या चिवड्याची चवच जाते.
त्यामुळे पावसाळ्यात पातळ पोह्यांचा चिवडा करताना काही गोष्टी नेमक्या आणि अचूक करायला हव्यात.
तरच पावसाळ्यातही पातळ पोह्यांचा चिवडा उत्तम जमेल. सादळणार नाही, वातड होणार नाही.

तर त्यासाठी काय करायचं?

१. पोहे भाजताना नेहमी मोठी कढई घ्या. लहान कढईत पोहे भाजले की ते आकसतात. मोठ्या कढईत भाजले की छान फुलतात. कुरकुरीत होतात. आणि चिवडा केल्यावर आक्रसलेले , कोमेजलेले दिसत नाहीत, चिवड्याचा पोत छान जमतो.
२. पावसाळ्यात पोहे ऊन्हात न ठेवता भाजावे लागतात. त्यामुळे चिवडा करताना ते जास्त वेळ मंद गॅसवर भाजा, मोठ्या गॅसवर घाईनं भाजू नका.
३. गरम पोहे ताटात काढू नये, ओलसर होतात वाफेने. शक्यतो कागदावर ओतावे, लांब पसरुन ठेवावेत.
४. फोडणी झाली की जराशी कोमट झाल्यावर पोह्यांवर ओता गरम फोडणी ओतू नये.
५. छान कालवून घेतल्यावरही पोह्याचा चिवडा मंद आचेवर मोठ्या कढईत पुन्हा परतून घ्यावा.
६. पोह्याचा चिवडा हे घाईचं काम नाहीच, त्यामुळे निवांतपणे करा. घाई केली चिवडा बिघडलाच.

पोह्यांचा चिवडा करताना त्यात थोडे मुरमुरे किंवा भडंग घातले तर पावसाळी हवेत चिवडा लवकर सादळत नाही.
मुळात एकदम जास्त चिवडा करू नका. अंदाजे-बेतानं करा.
हवाबंद डब्यात ठेवा. झाकड घट्टच हवं.
चुकूनही ओला चमचा चिवड्याच्या डब्यात घालायचा नाही.
फरसाण शेव आवडत असेल तर ऐनवेळी वरुन घ्या, पोह्याच्या चिवड्यात कालवून ठेवू नका.

ग्लोबल न्युज नेटवर्क: