सांगलीत पोलीस अधीक्षकासह 5 आमदारांना कोरोनाची लागण

सांगली । सांगली जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने संकट अधिकच गडद होत असताना जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्येही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत सात आमदारांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी दोन आमदार कोरोनामुक्त झालेत.

तर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि अन्य शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे रिपोर्ट पण पॉझिटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला, त्या काळात युद्धपातळीवर उपाययोजना राबवून जिल्हा कोरोनामुक्त सुद्धा झाला होता. मात्र पुन्हा, कोरोनाने री-एन्ट्री केल्याने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली आहे.

सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे 16 हजार जणांना कोरोनानं ग्रासलं आहे. आता तर आमदार, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. जिल्ह्यातील आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार सुमनताई पाटील आणि आमदार अनिल बाबर हे आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

त्या अगोदर माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत, आमदार मोहनराव कदम यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मात्र सध्या त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्याच बरोबरच पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अन्य शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे रिपोर्ट सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: