आ.रणजितसिंह यांच्या आमदार निधीतून जिल्ह्यातील ८ ठिकाणी बसणार ४८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

आ.रणजितसिंह यांच्या आमदार निधीतून जिल्ह्यातील ८ ठिकाणी बसणार ४८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

 

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे, जेऊर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय अकलूज आणि उपजिल्हा रुग्णालय, करमाळा या ८ ठिकाणी ४८ ऑक्सिजन  कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यासाठी ३८ लाख ४० हजारांचा आमदार निधी देत असल्याचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. या संदर्भातील पत्र आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे दिले आहे.

 

राज्यातील पंचायत समिती सदस्यांनी १५ व्या वित्त आयोगाचा निधी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यासाठी खर्ची घालावा असे आवाहन आ.रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी नुकतेच केले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानंतर आज (शुक्रवार) आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र पाठवून आपल्या सन २०२१- २२ च्या आमदार निधीतील ३८ लाख ४० हजारांचा निधी जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर ग्रामीण रुग्णालय आणि उप जिल्हा रुग्णालय अकलुज व उपजिल्हा रुग्णालय, करमाळा या ८ ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसवण्यासाठी खर्ची घालण्याचे सांगितले आहे.

यामध्ये टेंभुर्णी (ता.माढा) ६ कॉन्सन्ट्रेटर, मोडनिंब (ता.माढा) ६ कॉन्सन्ट्रेटर, करकंब (ता.पंढरपूर) ५ कॉन्सन्ट्रेटर, भाळवणी (ता.पंढरपूर) ५ कॉन्सन्ट्रेटर आणी मेडशिंगी (ता.सांगोला) ६ कॉन्सन्ट्रेटर याप्रमाणे या ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २५ व जेऊर ग्रामीण रुग्णालयात ५, उपजिल्हा रुग्णालय, अकलूज १३, करमाळा उपजिल्हा रुग्णालयात ५ असे मिळून एकूण ४८ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या निधीतून उपलब्ध होणार आहेत.

कोरोनाच्या भीषण संकटात सध्या ऑक्सिजनची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही १ लाख ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले आहे. राज्यातील पंचायत समिती सदस्यांनीही १५ व्या वित्त आयोगाचा निधी याकामी खर्ची घालण्याचे आवाहन आपण यापूर्वीच केले आहे. त्यानंतर आपल्या आमदार निधीतून जिल्ह्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जेऊर आणी अकलुज व करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालय अशा ८ ठिकाणी ४८  ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर बसवण्यासाठी ३८ लाख ४० हजारांचा निधी देत आहोत. ही समस्या सोडवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.

आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, विधानपरिषद सदस्य

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: