आजपासून महाराष्ट्रात ३ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईः महाराष्ट्रात १५, १६ आणि १७ मे या तीन दिवशी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ये यांनी सांगितला. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या पट्ट्याचे पुढील २४ तासांत चक्रीवादळात रुपांतर होण्याची चिन्हं आहेत. या वादळाचे नाव तौंते असे आहे. तौंते वादळाचा प्रभाव तीन दिवस दिसेल. यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या चार जिल्ह्यांमध्ये १६ आणि १७ मे रोजी वादळाचा प्रभाव जाणवेल.

heavy rain forecast for maharashtra

ज्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे, त्याच भागात शनिवार सकाळपर्यंत चक्रीवादळ असेल. रविवारी १६ मे रोजी चक्रीवादळ हळू हलू सरकू लागेल. यामुळे आधी गोवा आणि महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीच्या भागात पाऊस पडेल नंतर १८ मे रोजी गुजरातमध्ये अरबी समुद्राजवळ किनारपट्टीच्या भागात पाऊस पडेल.

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन गोवा आणि कोकण किनारपट्टीच्या भागात १५ ते १७ मे या तीन दिवसांसाठी दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. हवामान विभागाचा इशारा मिळताच आपात्कालीन विभागाने आवश्यकता भासल्यास तातडीने मदत करण्यासाठी तयारी केली आहे.

शनिवारपासून रायगडमध्ये वादळी वादळासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारी कोल्हापूर आणि सातारा येथील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: