25 हजार कोटींची घोटाळा झालेली बँक 300 कोटीचा नफा कशी कमवू शकते-अजित पवारांचा सवाल

ग्लोबल न्यूज नेटवर्क: शिखर बँकेत एका पैशाचाही घोटाळा केलेला नाही. या प्रकरणात आम्हाला आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आलेली नाही. 12 ते 13 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या बँकेत  25 हजार कोटींचा भ्रष्टाचार होईल का? तसेच जर  घोटाळा झाला असता तर आज 250 ते 300 कोटींचा नफा कमवू शकली असती का? असा सवाल अजित पवार यांनी केला. 

शिखर बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात होण्याच्या काळातच हा गुन्हा दाखल झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार म्हणाले, “शिखर बँकेच्या कोणत्याही पदावर शरद पवार नव्हते. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माध्यमातून वृत्त आल्यानंतरच शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मला कोणावरही आरोप करायचा नाही. यंत्रणांना तपास करण्याचा अधिकार आहे. त्यांनी खुशाल चौकशी करावी. पण ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना म्हणणं मांडायला वेळ द्यायला हवा ना?” असं अजित पवार म्हणाले.

बँकेतील घोटाळा आणि अनियमिततेविषयी बोलताना पवार म्हणाले, “बँकेच्या कारभारात अनियमितता झाली असेल, तर ती काय झाली हे सांगायला हवं. बँक अडचणी यावी, असे निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आले का ते सांगाव. तुम्ही बँकेच्या अमुक बैठकीला हजर होता, असं दाखवून द्यायला हवं. आम्ही आमची बाजू मांडू. बँकेच्या कारभारात राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना, भाजप, शेतकरी कामगार पक्ष अशा सर्वच पक्षाचे नेते आहेत. आरोप असलेले 70 लोक खोटं नाही ना बोलणार? असा प्रश्न अजित पवार यांनी केला.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: