’12 नाही, आपले तर 18 खासदार’, दिल्लीत पोहोचताच एकनाथ शिंदे यांचे सूचक विधान

 

४० आमदारांचे बंड घडवून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आता मोठा धक्का दिला. शिवसेनेचे राज्यातील १८ पैकी १२ खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता असून मुख्यमंत्री शिंदे आज त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राजधानी दिल्लीत उतरताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री शिंदे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. आज मंगळवारी दिवसभर ते दिल्लीत असणार आहेत, ते शिवसेनेच्या बंडखोर खासदारांची बैठक घेऊन आमचीच मूळ शिवसेना असल्याचा दावा करतील व एनडीएमध्ये त्यांना अधिकृतपणे सामावून घेतले जाईल, असे मानले जाते. आमदारांच्या बंडाबाबतही त्यांनी हीच भूमिका घेतली होती.

सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पक्षाचे लोकसभेतील नेते असून राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यांच्या जागी राहुल शेवाळेंची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. खासदारांनी वेगळी चूल मांडल्यास ठाकरे गटास कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल. दरम्यान, दिल्ली दौऱ्यासंदर्भात माहिती देताना एकनाथ शिंदेनी आपले 18 खासदार आहेत, असे म्हटले.

शिंदेंना दिल्लीत पत्रकारांनी गराडा घातला होता. त्यावेळी, शिवसेनेच्या 14 खासदारांची बैठकीला असलेल्या ऑनलाईन उपस्थितीबाबत प्रश्न केला. त्यावर, शिंदेंनी हसत-हसत उत्तर दिले. माझी कुठल्याही खासदारासोबत भेट झाली नाही. पण, 12 कशाला आपले 18 खासदार आहेत, सगळे खासदार मला भेटतील, असे एकनाथ शिंदेंनी दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे पोहोचताच म्हटले होते.

Team Global News Marathi: