१०२ वर्षांच्या ‘या’ आजीबाई रोज करतात योगा आणि व्यायाम

 

हिंगोली | आपण रोज व्यायाम करण्याचे ठरवतो, पण सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा अंथरुणातून बाहेर पडायची हिंमत होत नाही. पण व्यायाम करणं किती गरजेचं आहे, याचं महत्त्व कोरोना काळात बऱ्याच जणांना पटलंय. मात्र तरीही अनेक लोक व्यायाम, योगासनं करण्याचा कंटाळा करतात. पण हिंगोली राहणाऱ्या 102 वर्षांच्या आजीबाई याला अपवाद ठरल्या आहेत. गेल्या 75 वर्षांपासून दररोज न चुकता त्या योगासने आणि व्यायाम करतात.

रमाबाई तुकाराम बुवा आजेगावकर असं या आजीचे नाव असून त्या हिंगोलीत सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे राहतात. वयातची शंभरी ओलांडली असली तरी त्यांनी व्यायाम करणं थांबवलं नाही. आज त्यांचं वय 102 वर्ष आहे, तरीदेखील गेल्या 75 वर्षांपासून त्या दररोज व्यायाम करतात. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या आजीबाईंची दिनचर्या पहाटे पाच वाजता सुरू होते. सहा ते साडेसहा या अर्ध्या तासाच्या वेळेत त्या योगा करतात. नंतर देवपूजा करून साडेअकराला जेवण करतात. मग वामकुक्षी आणि सायंकाळी जेवण करून लवकरात लवकर झोपतात.

अनेक जण काही दिवस व्यायाम करतात आणि नंतर थांबतात. पण गेल्या ७५ वर्षांच्या काळात या आजींनी आपला दिनक्रम बदलला नाही. विशेष म्हणजे त्यांना अजूनही चष्मा नाही. पुस्तकांचे, वृत्तपत्रांचे त्यांना अगदी सहज वाचन करता येतं. एवढं वय होऊनही हातात काठी आली नाही.

Team Global News Marathi: