१०० वर्ष पार केलेल्या रुपी बँकेला आजपासून टाळे लागणार

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या ११० वर्षांच्या रुपी बँकेला अखेर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात टाळे लागत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार गुरुवारपासून बँकेचे बँक म्हणून असलेले सर्व व्यवहार बंद होतील. राज्याचे सहकार खाते आता बँकेसंदर्भातील सर्व निर्णय घेणार आहे. मालमत्ता विकून बँकेची देणी भागवणे हा त्यातील प्रमुख भाग असेल.

मागील काही वर्षांपासून बँकेला वाचवण्याचे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू होते. त्यासाठी राज्याच्या सहकार क्षेत्रातील काहीजण प्रयत्न करीत होते. सारस्वत बँकेसह काही बँकांनी विलीनीकरणाचे प्रस्तावही दिले होते. मात्र, रिझर्व्ह बँकेने त्यासंदर्भात वेळेवर निर्णय घेतला नाही. विलंब लावला.

दरम्यानच्या काळात ठेव विमा महामंडळाने बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर जास्तीत जास्त ५ लाख रुपयांचा परतावा देण्यास सुरुवात केली. त्यानुसार तब्बल ७०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे ही बँक आपल्याला विलीन करून घेण्याच्या प्रस्तावातील अन्य बँकांचा रसही संपला व अखेर रिझर्व्ह बँकेने १० ऑगस्ट २०२२ ला बँकेचा मृत्यू दिनांक म्हणून २२ सप्टेंबर २०२२ ही तारीख निश्चित केली.

त्यानुसार आता बँकेला उद्यापासून टाळे लागेल. बँकेचे सुमारे ५ लाख खातेदार होते. त्यातील बहुसंख्य खातेदार मध्यमवर्गीय नोकरदार आहे. त्यांचे तब्बल ६५० कोटी रुपये बँकेत अडकले. बँकेची बाजारातील गुंतवणूक सुमारे ८०० कोटी रुपयांची आहे. त्याशिवाय बँकेची मालमत्ता साधारण १०० कोटी रुपयांची आहे. बँकेला ६५० कोटी रुपयांचे देणे आहे. तसेच ठेव विमा महामंडळाचे ७०० कोटी रुपयेही परत करायचे आहेत.

Team Global News Marathi: