१ नोव्हेंबरपर्यंत राणा यांनी माफी मागितली नाही तर वेगळा निर्णय घेऊ – बच्चू कडू

 

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला समर्थन देणाऱ्या अमरावती जिल्ह्यतील आ. बच्चू कडू व आ. रवी राणा यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे.राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे बच्चू कडू दुखावले आहेत. समर्थनासाठी पैसे (खोके) घेतल्याचा आरोप करणाऱ्या राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे, अन्यथा त्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. आठ ते दहा आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

बच्चू कडू यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत राणा यांच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर येऊन स्पष्ट करण्याची मागणी केली. कडू म्हणाले, पन्नास खोक्यांचा आरोप विरोधकांकडून होत असताना आम्ही दर्लक्ष केले. पण सत्तेत सहभागी असलेले आ. रवी राणा यांच्याकडून चुकीचे आरोप झाल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. राणांच्या आरोपामुळे शिंदे सरकारला पाठिंबा देणारे इतर आमदारही दुखावले आहेत. आम्ही आठ ते दहा आमदार एकत्र बसणार आहोत.

प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशीही आपण चर्चा करू. १ नोव्हेंबरपर्यंत राणा यांनी माफी मागितली नाही किंवा आरोपाशी संबंधित पुरावे दिले नाहीत तर वेगळा निर्णय घेऊ व बच्चू कडू स्टाईलनेच आरोपांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

Team Global News Marathi: