७४ टक्के लोकांची मुख्यमंत्री शिंदेंना नापसंती- अजित पवारांचा टोला

७४ टक्के लोकांची मुख्यमंत्री शिंदेंना नापसंती- अजित पवारांचा टोला

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीत २६ टक्के लोकांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून आवडतात. म्हणजेच ७४ टक्के लोकांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नकोत, असे त्या जाहिरातीवरून कळल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मिटमिटा येथील सिल्व्हर लॉन्स येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर घेण्यात येत आहे. शनिवारी (ता. १७) अजित पवार यांच्या हस्ते मशाल पेटवून शिबिराचे उद्­घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी अजित पवार बोलत होते.

दरम्यान, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्यासाठी जिवाचे रान करू, असे एका कार्यकर्त्याने कार्यक्रमात म्हटले. तोच धागा पकडत अजित पवार म्हणाले, की नंदुरबार, धुळे येथे प्रतिनिधी नाही. छत्रपती संभाजीनगरात एकही आमदार नाही.

जालन्यात केवळ एकच आमदार, परभणी एकही नाही, मग कसा होणार मुख्यमंत्री? यासाठी महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणा, असे आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केले.

पुढील वर्षी लोकसभा-विधानसभा निवडणुका होणार आहेत. यानिमित्ताने नवीन पक्ष राज्यात आपले नशीब आजमावणार आहे. यात प्रामुख्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्या पक्षाचा प्रयत्न राहील. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हतबल होता कामा नये. पुढील काळात जोमाने कामाला लागावे, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

अजित पवार म्हणाले, की सध्याच्या काळात महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्­न हे विषय महत्त्वाचे आहेत. आपला पक्ष हा सेक्युलर आहे. बूथनिहाय कमिट्या स्थापन करा, त्यात सर्व समाजाच्या लोकांना सहभागी करून घ्या.

पक्ष रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. केवळ गर्दी जमवून आणि घोषणा देऊन चालणार नाही. प्रत्यक्ष कामे करा, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण कधी नव्हे, एवढे राजकारण ढवळून निघाले आहे. आपले सरकार असताना आदिवासींसह सर्व मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविल्या होत्या.

आता त्या थांबविण्यात आल्या आहेत. याविषयी सरकारला देणे-घेणे नाही. सरकार केवळ शिंदेंचे ४० आमदार सांभाळण्यात आणि बदल्यांमधील भ्रष्टाचारात दंग असल्याचा टोलाही अजित पवारांनी लगावला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: