“२०२४ च्या निवडणुकीत शिंदे गटाचा सुपडा साफ करणार, तुमच्यात दम असेल तर…”

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष आगामी काळात जास्तच तीव्र होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या दोन्ही गट झडताना दिसत आहेत.

यातच हे सगळे भाजपचे षड्यंत्र असून, सन २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाला सुपडा साफ करणार असल्याचा इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे. युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी चांगलेच आक्रमक झाले असून, शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यापूर्वीही अनेकदा शरद कोळी यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. आता मात्र शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यावर शरद कोळी यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. हे तर भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांचे षडयंत्र आहे, असा आरोपही शरद कोळी यांनी केला आहे.

भविष्य काळात महाराष्ट्र राज्यात शिवसैनिक आक्रमक होतील आणि कायदा व सुवस्थेचे प्रश्न निर्माण होईल आणि याला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पक्ष असेल, असा इशारा देत, सन २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यात दम असेल तर महाराष्ट्र राज्यात एकत्रित सार्वजनिक व मध्यावधी निवडणूका घ्या. राज्यातील जनता यांना घरी बसवल्या शिवाय राहणार नाही, असे आव्हान शरद कोळी यांनी शिंदे गटासह भाजपला दिले आहे.

Team Global News Marathi: