हे मणिपूर किंवा गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे – शरद पवार

मुंबई । महाविकास आघाडीच्या 162 आमदारांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये ओळखपरेड झाली. बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. पण हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचं लादलं तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सर्व 162 आमदारांना एकत्र घेऊन मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकीत हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. आज केंद्राची सत्ता ज्याच्या हातात आहे. त्यांनी देशातल्या काही राज्यात बहुमत नसताना देखील सत्ता स्थापन केली आहे. संसदीय पद्धतीच्या मार्गदर्शन तत्वांना हरताळ फासून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. उद्या जर कोर्टाने आपल्याला विश्वासदर्शक ठराव सादर करण्यास सांगितले तर सहज करू, आपल्याकडे 162 आमदाराचं नाहीतर आणखी आमदार संपर्कात आहे. आज 162 आमदार समोर आहे, अजून काही आमदार दाखवायचे असेल तर तेही दाखवू, असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्या व्यक्तीला पक्षात दूर करण्याचा, अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला त्यांना पक्षाला कोणताही आदेश देण्याचा अधिकार नाही, घटनातज्ज्ञ, संसदेतील दिग्गज तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली. आदेश देण्याचा अधिकार अजित पवारांना नाही, जे अशा गोष्टी करतायेत ते संभ्रम निर्माण करण्याचा काम करत आहेत. याबाबत नवीन आमदारांनी निश्चिंत राहा असं त्यांनी सांगितले. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: