सोलापूर भाजपला गळती सुरू; माढ्याचे साठे पिता-पुत्र पुनः काँग्रेसमध्ये वापस

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतर सत्तेत आलेल्या महाविकासआघाडीच्या सरकारमुळे गेल्या पाच वर्षात भाजपमध्ये गेलेल्या बहुतांश नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली दिसून येते. याच पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात सध्या भाजपात असलेले आणि माढा तालुक्यातील जुने काॅग्रेसचे निष्ठावंत साठे घराण्याची घरवापसी होण्याची शक्यता चर्चेत येत होती.ही चर्चा खरी ठरली असून गुरुवारी माजी आमदार धनाजी साठे यांनी पुत्र दादासाहेब साठे यांच्यासह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. त्यामुळे भाजपला माढ्यात मोठा फटका बसलेला आहे .

दादासाहेब साठे यांनी 2014 सालच्या विधानसभा निवडणूकीत भाजपापुरस्कृत निवडणूक लढवली. तत्कालीन निवडणूकीत भाजप पक्षाला उमेदवार नव्हता. यावेळी निवडणूक कठीण असतानाही भविष्यकाळात कुर्मदास कारखान्यास मदत होण्याच्या शब्दाखातर भाजपकडून निवडणूक दादासाहेब साठे यांनी निवडणूक लढवली. यामध्ये अपयश आल्यानंतरही नव्याने स्थापन झालेल्या माढा नगरपंचायतीवर बहुमताने साठे गटाने सत्ता स्थापन केली.

जिल्ह्यातील भाजपशासित एकमेव नगरपंचायत ठरली. माढा नगरपालिकेत 17 पैकी 11 नगरसेवक निवडून आणून सत्ता आणली. नगराध्यक्षपदी सध्या त्यांच्या स्नुषा ऍड. मीनल साठे या आहेत. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यावर कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यामुळे साठे यांनी कॉंग्रेस प्रवेशासाठी पुन्हा प्रयत्न सुरु केले. काही दिवसांपूर्वी त्यांनी श्री. शिंदे यांच्याशी चर्चा करून प्रवेश निश्‍चित केला होता.

यावेळी आमदार ऍड. रामहरी रूपनवर, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, महापालिकेतील गटनेते चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, शिवलिंग सुकळे, गौरव खरात यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: