विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
सोलापूर जिल्ह्यात एकूण ३४ लाखाच्यावर मतदार तर
२५ हजार नवे मतदार
सोलापूर – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण तयारी झालेली असून निर्भय, नि:पक्षपातीपणे व शांततामय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राजकीय पक्ष व नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी भोसले बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिका आयुक्त दिपक तावरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले पुढे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चा निवडणूक कार्यक्रम नुसार दि. २७ सप्टेंबर २०१९ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दि. ४ ऑक्टोबर तर नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याचा दि. ५ ऑक्टोबर असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दि. ७ ऑक्टोबर आहे. तसेच मतदानाचा दि. २१ ऑक्टोबर असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दि. २७ ऑक्टोबर २०१९ असा असल्याची माहिती त्यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघात एकूण ३४ लाख २१ हजार ३२४ इतके मतदार असून लोकसभा निवडणूक २०१९ पेक्षा २४ हजार ६११ अधिकचे मतदार नोंदणी झालेली आहे. विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये मतदानाची एकूण टक्केवारी ६७.२ इतकी होती, लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये ६१.२७ टक्के मतदान झाले होते, असे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगून एकूण मतदारांमध्ये १३ हजार २८२ हे दिव्यांग मतदार असून दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी ३ हजार ५२१ मतदान केंद्र आहेत. तर ५ हजार ६५० बॅलेट युनिट, ७ हजार ६१० कंट्रोल युनिट व ५ हजार ९० मशीन उपलब्ध झालेल्या असून मशीनची प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण झालेली असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली. या निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी २० हजार मनुष्यबळाची आवश्यकता असून प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आदर्श आचारसंहिता व इतर निवडणूक विषयक विविध समस्या मांडून त्याबाबत प्रशासनाने त्वरीत कार्यवारी करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती भोसले यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांच्या नोडल अधिका-यांची माहिती देऊन त्यांना त्यांच्या ही अवगत केले.