सोलापूर | लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षांनी आपली मोर्चेबांधनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी आता विधानसभेच्या रिंगणात विजय मिळवण्यासाठी हे पक्ष सज्ज झाले आहे. सोलापुरात शुक्रवारी अजित पवारांच्या उपस्थिती राष्ट्रवादीमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. ज्या इच्छुकांनी विधानसभेसाठी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या मुलाखती 26 जुलै रोजी राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी अजित पवार आणि निरीक्षक सुरेश घुले यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सोलापुरातील रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवनात या मुलाखती होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत राष्ट्रवादी भवनात प्रथम शहर आणि त्यानंतर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. विधानसभेसाठी अर्ज केलेल्या इच्छुकांनी समर्थकांसोबत येताना परिचय पत्र आणावे असे आवाहनही जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे – पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केले आहे.