सूर्यकांत भिसे यांचा मुक्ताई संस्थांनच्या ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्काराने सन्मान

सूर्यकांत भिसे यांचा ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्काराने सन्मान
वारकरी सांप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची : माजी आ . सुधाकरपंत परिचारक

पंढरपूर – आध्यात्मिक क्षेत्रासह वारकरी सांप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची राहिली आहे . त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे . सूर्यकांत भिसे यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे असे मत माजी आ . सुधाकरपंत परिचारक यांनी व्यक्त केले .


श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी – मुक्ताईनगर यांच्या वतीने स्वर्गीय प्रल्हादराव उर्फ भाऊसाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ वारकरी सांप्रदायात उल्लेखनीय कार्य करणारे जेष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांना ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्काराने माजी आ . परिचारक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते . या प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ ज्ञानेश्वर माऊली जळगावकर , संत तुकाराम महाराजांचे वंशज ऋषी महाराज मोरे देहूकर , संत एकनाथ महाराजांचे वंशज योगेश महाराज गोसावी , श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील , विश्वस्थ पंजाबराव पाटील , जयंतराव महल्ले , श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाजाचे अध्यक्ष मारुती महाराज कोकाटे, अमोल पाटील ,ज्ञानेश्वर हरणे , पत्रकार संघाचे सचिव शंकर टेमघरे , खजिनदार विलास काटे , सदस्य शहाजी फुरडे-पाटील मान्यवर व वारकरी उपस्थित होते .


प्रारंभी संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवीन्द्र महाराज हरणे यांनी पुरस्कारा विषयी माहिती देवून सूर्यकांत भिसे यांनी आपल्या वारीच्या २९ वर्षाच्या पत्रकारितेत सकारत्मकता स्विकारली व आपल्या सहकार्यांनाही स्विकारण्यास भाग पाडले . आज वारीचे भव्य स्वरुप ही प्रसार माध्यमांनी या क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी आहे म्हणूनच सांप्रदायाच्या वतीने हा पुरस्कार भिसे यांना देवून त्यांचा सन्मान करण्यात येत आहे .


माऊली जळगावकर म्हणाले , निवृत्ती , ज्ञानदेव , सोपान , मुक्ताबाई , एकनाथ , नामदेव ,तुकाराम या संतांच्या पालख्या या वारकरी सांप्रदायाने अधारभूत मानल्या आहेत . या पालखी सोहळ्यांच्या माध्यमातून सूर्यकांत भिसे व त्यांच्या पालखी सोहळा पत्रकार संघाने भागवत धर्माचा सकारात्मक प्रचार व प्रसार केला आहे. सांप्रदायातील चुकीच्या प्रकारावर निर्भीडपणे लिखाण केले आहे म्हणूनच ते अभिनंदनास पात्र आहेत .


ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील म्हणाले , सूर्यकांत भिसे यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टीकोण ठेवून मुक्ताई संस्थानला सहकार्य केले आहे . त्यांच्याच प्रयत्नाने श्री पांडुरंगाच्या पादुका मुक्ताईनगरला येवू लागल्या आहेत . संस्थानच्या वतीने भविष्यात कृषी व सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले .
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन विशाल महाराज खोले यांनी तर आभार प्रदर्शन सर्जेराव महाराज देशमुख यांनी केले .

चौकट
पुरस्काने जबाबदारी वाढली
आपल्या सत्काराला उत्तर देताना जेष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे म्हणाले , वारकरी सांप्रदायात गेली २९ वर्षे काम करण्याची संधी मिळाली त्याचे आज सोने झाले . ” भागवत धर्म प्रसारक ” या पुरस्काराने माझी सांप्रदायातील जबाबदारी वाढली आहे . पुरस्काराची रक्कम रु . ११,००० मध्ये स्वतःचे ५०१ रुपये घालून मी ही रक्कम या कार्यासाठी संस्थानला परत देत आहे ती त्यांनी स्विकारावी असे ते म्हणाले .

ग्लोबल न्युज नेटवर्क: