सुरुवात त्यांनी केली पण हा खेळ आम्ही संपवू अजित पवारांचा इशारा

मुंबई: गेल्या काही दिवसात अनेक बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सेना-भाजपात गेले अशांची कानउघाडणी करत अनेक जण पक्ष सोडून जात असले तरी हरकत नाही. काट्याने काटा काढला जातो. सुरुवात त्यांनी केली, हा खेळ आम्ही संपवू, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके व शहापूरचे माजी आमदार दौलत दरोडा यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारत भालके व दौलत दरोडा यांचे स्वागत केले. भारत भालके आणि खा. शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. यापूर्वी भालके अपक्ष म्हणून निवडून आले होते. कालांतराने ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि आता राष्ट्रवादीच्या विचारधारेला धरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचे अजित पवार म्हणाले.

माजी आमदार दौलत दरोडा यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते पांडुरंग बरोरा यांच्या आधी आमदार झालेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाल्यानंतर त्यांचे सहकार्य पक्षासाठी उपयोगी ठरेल, असे देखील पवार म्हणाले.

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही याबाबत मित्रपक्षांशी चर्चा करून ठरेल. तसेच आघाडीबाबत व मित्र पक्षांच्या जागांबाबत येत्या २ ऑक्टोबर रोजी संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी ती जागा लढवत आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव सध्या चर्चेत आहेत. पण ते जागा लढवण्यात इच्छुक नसल्यास आम्ही लढू, असे त्यांनी सांगितले.

बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते. आम्ही विरोधी पक्षाला कधीच कमकुवत समजत नाही. प्रत्येक उमेदवारास आम्ही तुल्यबळ उमेदवार समजतो. कोणीही असूदे, राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीची जागा दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आणणार, असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: