सांगलीत बचावकार्या दरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू

सांगली :कोल्हापूर- सांगलीमध्ये महापुराने थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना बोट उलटून 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सांगलीतील पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात महापूर आला आहे. पुरात अडकलेल्या 30 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून बोट पाठवण्यात आली होती. ब्रम्हनाळपासून खटावकडे या नागरिकांना नेण्यात येतं होतं.

पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही बोट उलटली आणि नागरिक पुराच्या पाण्यात पडले. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे त्यात 14 जणांचा बुडून मृत्यू झाला.

14 जणांचे मृतदेह सापडले असून 16 जणांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, एक लहान मुलगी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अजूनही वाढ होत आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 56 फूट 8 इंचावर गेली आहे.कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचा विळखा कायम आहे. सांगलीत दूध, पाणी, भाजी यासाठी लोकांना फारच कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी गर्दी झाली होती. पूरग्रस्त भागात वीज सेवा पूर्णपणे आहे. 

अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरात अडकलेल्या लाखाहून अधिक लोकांनी जड अंतःकरणाने घरदार सोडण्याची वेळ आली आहे. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोहीम सुरू होती. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, टेरिटोरिअल आर्मी,  महापालिकेचे कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील कर्मचारी, स्वयंसेवी संस्था बचावासाठी झटत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील शेकडो गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. घरात पाणी घुसले आहे. सांगली  शहरातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. शहरात मध्यवर्ती भागापर्यंत पाणी आले आहे. नदीकाठावरील अनेक रस्त्यांवर  पाणी आल्याने जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. 

सांगली जिल्ह्यातील 70 हजार नागरिक आणि 21 हजार जनावरं स्थलांतरित करण्यात आली आहेत. 21 हजार 500 हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. भारतीय सैन्य आणि एनडीआरएफच्या टीमकडून अजूनही बचावकार्य सुरुच आहे.

एनडीआरएफच्या आणखी दोन टीम आणि कोस्टगार्डच्या दोन टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. गरज भासल्यास जिल्ह्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात येणार आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: