‘ समोवार ‘ सुमारे 3600 वर्षांपासून वापरले जाते हे भांडे, वाचा कुठे आणि कशासाठी

समोवार ! काश्मिरी चहाचा बंब !!

ग्लोबल न्यूज मराठी : शून्याच्या खाली गेलेले तापमान आणि हाडे फोडणारी थंडी कायमचीच सोबतीला असलेल्या रशियातील परंपरागत ( चहाचा बंब ) हे खास भांडे म्हणजेच समोवार !

पाणी तापविण्याच्या बंबासारखीच याची रचना आणि कार्य असते. पाणी तापवायला अग्नी पेटविण्यासाठी, भांड्याच्या मधोमध मोठा पाईप आणि त्याच्या सभोवार ( सर्व बाजूंनी ) पाण्याचे भांडे अशी याची रचना असते. त्यामुळे याचे समोवार हे मूळचे रशियन नाव सभोवारशी मिळतेजुळते वाटते. अझरबैजानमध्ये सुमारे ३६०० वर्षांपूर्वीचे समोवार सापडले आहे.

रशियाबाहेर पूर्व आणि आग्नेय युरोप, इराण, अफगाणिस्तान, आखाती देश अशा विविध ठिकाणी याचा प्रसार झाला. इराणमध्ये २०० वर्षांहून अधिक काळ ते वापरले जाते.

भारतात अनेक राज्यांमध्ये, पाणी तापविण्याचा बंब प्रसिद्ध आहे. पण काश्मीरमध्ये मात्र हे समोवार खूपच लोकप्रिय ! बंब म्हटले की अगडबंब, उघडाबंब अशा शब्दांची आठवण करून देणारा कुणीतरी आडदांड वाटतो. त्या तुलनेत समोवार म्हणजे काश्मीरची नाजूक सुंदरीच म्हणायची !

काश्मीरमधील कडाक्याच्या थंडीत तेथील खास पद्धतीने बनविलेला चहा म्हणजेच काहवा किंवा कावा. या चहामध्ये वेलची, दालचिनी, केशर. थोडेसे मीठ घातले जाते. ग्रीन टी ची पानेदेखील वापरली जातात. हा काहवा या समोवारमध्ये तयार केला जातो, ठेवला जातो. भांड्याच्या मधोमध असलेल्या पाईपमध्ये निखारे असल्याने तो सतत गरम राहतो. त्याला असलेला कॉक सोडून कपमध्ये घेता येतो. थंडीवर उपाय म्हणून काहवा थोडा थोडा प्यायला जातो. प्यायला गरम आणि प्रकृतीला तो खूप उष्ण असतो.

              पूर्वी  काश्मीरमध्ये मुस्लिम समाज तांब्याचे आणि हिंदू पंडित पितळेचे समोवार वापरत असत. त्यावर अतिशय सुंदर कोरीवकाम, नक्षी, विविध चित्रे कोरली जात असत. काश्मीरचे सौंदर्य हे तिथला निसर्ग, माणसे, फळे, फुले यांच्यात जसे दिसते, तसे ते तेथे निर्मिलेल्या शाली, वस्त्रे, फर्निचर, अशा वस्तुंमध्येही दिसते. 

तसेच ते अनेक समोवारमध्येही दिसते. परंपरागत कोरीव कामाबरोबरच अप्रतिम मीनावर्क,एनॅमलचे काम, बिद्री काम केलेले समोवार आढळून येतात. त्यामुळे अनेक सौंदर्यप्रेमी हे समोवार भांडे आपल्या हॉलमध्ये शोभेची वस्तू म्हणून ठेवतात. मुंबईत समोवार नावाचे एक हॉटेल ५५ वर्षे चालू होते. या हॉटेलमध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते. अनेक कलावंत, चित्रकार, लेखक यांचे ते आवडते हॉटेल होते.

सोबत माझ्याकडील एका समोवारचे छायाचित्र !!

मकरंद करंदीकर

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: