सदगुरु नागठाणकरसह दुहेरी हत्याकांड घडविणारा मारेकरी दहा तासात जेरबंद

नांदेड| नागठाण ता.उमरी येथे बाल तपस्वीसह दोन खून करणार्‍या युवकाला महाराष्ट्र पोलीस आणि तेलंगणा पोलिसांच्या मदतीने तानूर गावात अटक केली आहे.

आज पहाटे दोन वाजता श्री ष.भ्र.1008 सदगुरु निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य गुरु मावली नागठाणकर (33), मठातील भक्त भगवान रामराव शिंदे (50) रा.चिंचाळा या दोघांचा खून करुन नागठाण (बु.) येथील साईनाथ आनंदा लिंगाडे (25) याने सदगुरु नागठाणकर यांचा मृतदेह त्यांचीच चारचाकी गाडी क्र.एमएच-26-बीएस-4580 च्या डिक्कीत टाकून गाडी घेवून पळताना ही गाडी मठाच्या मुख्य व्दाराला धडकली.

या आवाजाने मठातील इतर लोक उठले आणि बाहेर आले तेंव्हा साईनाथ लिंगाडे चारचाकी गाडीच्या बाहेर आला आणि तेथेच उभी असलेली एका भक्तांची मोटारसायकल क्र.एमएच-26-व्हीएस-4530 वर बसून पळून गेला. त्याला पळताना अनेकांनी पाहिले. मठातील लोकांनी गाडीमध्ये सदगुरुचा मृतदेह पाहिला तेंव्हा आक्रोश झाला. लोकांनी नंतर मठात भगवान शिंदे यांचा मृतदेह पाहिला. झालेली घटना वार्‍यासारखी सर्वत्र पसरली आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी विजयकुमार मगर, भोकरचे अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उमरीचे पोलीस निरीक्षक अनंत्रे, भोकर, धर्माबाद येथील अनेक अधिकारी उमरी येथे पोहंचले.

स्थानिक गुन्हा शाखेचे पथक पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्यासह एक पथक उमरी येथे पोहंचले. पोलीस अधिकार्‍यांनी झालेल्या दुहेरी खुनाचे गांभिर्य लक्षात घेत अत्यंत जबरदस्तपणे तांत्रिक शोधाचा आधार घेत मारेकरी साईनाथ लिंगाडेचा पाठपुरावा केला. धर्माबादचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्‍हाड, त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी शेषराव कदम, भाऊराव पावडे आणि शेख फेरोज यांच्या पथकाला तेलंगणा राज्यातील तानूर येथे जाण्याचा आदेश प्राप्त झाला. धर्माबादपासून तानूर हे गाव 20 किलोमीटर अंतरावरच आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार मारेकर्‍यांनी खून करुन दुचाकीव्दारे नागठाण, उमरी, भोकर मार्गे तानूर गाठले होते. महाराष्ट्र पोलिसांनी तेलंगणातील तानूर पोलिसांसोबत संपर्क ठेवून साईनाथ लिंगाडेला पकडण्यास सांगितले. महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तानूर येथील पोलीस निरीक्षकाने गणेश कर्‍हाड व त्यांच्या पथकाला साईनाथला पकडण्यास मदत केली. तब्बल दहा तासाताच पोलिसांनी दुहेरी खुनाचा मारेकरी जेरबंद केला आहे. लॉकडाऊन परिस्थितीत साईनाथ लिंगाडेने रोख रक्कम आणि संपत्ती लुटण्यासाठीच सदगुरु मावलीचा खून केला. त्यांच्यासोबतच एका भक्तालाही मारुन टाकले.

सदगुरु नागठाणकर यांच्या भक्तांनी मारेकरी पकडल्याशिवाय सदगुरुवर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती. पोलिसांनी दहा तासातच मारेकर्‍याला जेरबंद करुन या विषयाला पूर्णविराम दिला आहे. सन 2008 मध्ये अर्थात आपल्या 21 व्या वर्षीच सदगुरु नागठाणकर यांचा पट्टाभिषेक झाला होता. अत्यंत छोट्या वयात धार्मिक अभ्यास करुन महंत पदवी मिळविणारे नागठाणकर हे पंचक्रोशिसह दूरदूर पर्यंत मानले जाणारे महंत होते. नांदेड पोलिसांनी दहा तासाच्या आत त्यांचा मारेकरी जेरबंद करुन आपल्यातील चुणूक दाखवली आहे.

पशुपतीनाथ महाराजांची हत्याचा निषेध – संजय कौडगे
उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दोन वाजताच्या सुमारास खून करण्यात आला या घटनेचा संजय कौडगे यांनी निषेध केला आहे. महाराष्ट्र ही साधु संतांची भूमि असून गेल्या महिन्यात पालघर येथे साधुची हत्या झाली होती त्यापाठोपाठ नागठना येतील साधु ची हत्या करण्यात आली.खून करुण आरोपी फरार आहे त्याला लवकरात लवकर पकडूंन सजा देण्यात यावी अशी मागणी संजय कौडगे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या कड़े केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: