सकल मराठा समाजाच्या जिल्हा समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करावा:राजेंद्र राऊत यांची अपेक्षा,बार्शीत मराठा जात प्रमाणपत्र मदत केंद्र सुरू

गणेश भोळे/ धीरज करळे

बार्शी
सकल मराठा समाज व राजाभाऊ राऊत मित्रमंडळ यांच्यावतीने मराठा समाजासाठी मोफत एसईबीसी जात प्रमाणपत्र मदत केंद्राचे उदघाटन शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते झाले.

येथील संत तुकाराम सभागृहात झालेलया या उदघाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही.एस.पाटील, जयकुमार शितोळे, दिलीप रेवडकर, प्राचार्य प्रकाश थोरात, पंचायत समितीच उपसभापती अविनाश मांजरे, पंचायत समिती सदस्य अनिल डिसले, पांडुरंग गव्हाणे, नारायण जगदाळे, प्रा.किरण गाढवे यांच्यासह जि.प.सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आ. राजेंद्र राऊत म्हणाले, सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षणासाठी राज्यात ५८ मोर्चे निघाले. अनेकांचे यात योगदान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजाला कायदयाच्या चौकटीत आरक्षण दिले. उच्च न्यायालयातही ते वैध ठरले. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला आहे.

शासनाच्या वतीने लवकरच विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहे. मराठा समाजातील विदयार्थ्यांनाही विविध ठिकाणच्या प्रवेशासाठी या जात प्रमाणपत्राची गरज भासत आहे. त्यामुळे विदयार्थ्यांची धावपळ होत आहे. मराठा समाजातील युवकांना लवकरात लवकर हे एसईबीसी हे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजबांधवांनी या मोफत जात प्रमाणपत्र केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन राऊत यांनी केले.

राऊत पुढे म्हणाले, गतवर्षी आरक्षणाच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढीच्या श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेपासून रोखण्यात आले होते. वर्षभरात आरक्षणाच्या मागणीची पूर्तता करून त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला आहे. त्यामुळे यंदा ते पूजेसाठी आल्यानंतर त्यांचा सकल मराठा समाजाच्यावतीने यथोचित सन्मान व्हावा अशी इच्छा व्यक्त करत बार्शी सकल मराठा समाजाच्या कार्यकारिणीने तसा प्रस्ताव सकल मराठा समाजाच्या जिल्हा समन्वय समितीकडे दयावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ.बी.वाय. यादव म्हणाले, विदयार्थ्यांना प्रवेश अथवा नोकरी साठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना मोठी धावपळ करावी लागते असे सांगत त्यांनी स्वत: विदयार्थी दशेत असताना रहिवाशी प्रमाणपत्र काढताना आलेल्या अडचणींचा व तहसील कार्यालयात माराव्या लागलेल्या हेलपाट्यांचा किस्सा सांगितला. त्यामुळे विदयार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या केंद्रामुळे विदयार्थ्यांची व पालकांची सोय होईल असा विश्वास व्यक्त केला.

प्रा.किरण गाढवे यांनी प्रास्ताविकात विदयार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून हे केंद्र सुरू करण्यात येत आहे. ६ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते ५ यावेळेत संत तुकाराम सभागृहात हे केंद्र सुरू राहील असे सांगितले.

खंडू डोइफोडे यांनी जात प्रमाणपत्रासाठी लागणारी फी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावतीने देण्यात येणार असून गरजूंना हे एसईबीसी प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले. एसईबीसी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी शाळा सोडलयाचा दाखला, वडील/चुलते/आत्या/आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला, १९६७ पूर्वीचा मराठा जातीला उल्लेख असलेला दाखला अथवा निर्गम उतारा, प्रतिज्ञापत्र, अर्जदाराचे आधारकार्ड आदी कागदपत्र आवश्यक असल्याचे सांगितले.

या उपक्रमासाठी दिलीप सुरवसे, महेश देशमुख, मदन गव्हाणे, कल्याण घळके, संदीप मिरगणे, विजय राऊत, अजय पाटील, उमेश काळे, रावसाहेब यादव, मंगेश दहिहांडे आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: