अश्‍व धावले रिंगणी झाला टाळ, मृदुंगाचा ध्वनी ॥संत तुकाराम पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल

अकलूज/औदुंबर भिसे
अश्‍व धावले रिंगणी
झाला टाळ, मृदुंगाचा ध्वनी ॥

या अभंगाची साक्ष देत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य प्रांगणात देवाच्या व स्वाराच्या अश्‍वाने नेत्रदिपक दौड करून लाखो वारकर्‍यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.


 प्रारंभी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुका निरा स्नानाकडे नेण्यात आल्या. परंतू निरा नदीमध्ये पाणी नसल्याने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना टँकरद्वारे स्नान घालण्यात आले. टँकरद्वारे पादुकांना स्नान घालताना वारकर्‍यांमध्ये एकच हळहळ व्यक्त होत होती. २०१६ सालीही तुकाराम महाराजांच्या पादुकांना टँकरने स्नान घालण्यात आले होते. 

तेव्हापासून आजतागायत नदी पात्र कोरडे राहिल्याने पादुकांना निरा स्नान घालण्यात आले नाही. सकाळी ७ वा. पादुकांना टँकर स्नान घालण्यात येवून सोहळा ७.३० वा. अकलूज मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सकाळी ८ वाजता नगार्‍याचे आगमन झाले. त्यानंतर ८.१५ वाजता तुकोबांच्या अश्‍वांचे आगमन झाले.

नगारा व अश्‍वांचे स्वागत पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी शमा पवार, तहसिलदार अभिजीत पाटील, माजी जि.प.अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सूळ, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख आदिंनी सोहळ्याचे स्वागत केले तर पुणे जिल्हा प्रशासनाने सोहळ्याला निरोप दिला. यावेळी रथाचे सारथ्य पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले.

सकाळी ९.४१ वाजता सोहळा गांधी चौक येथे पोहोचला. यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, रणजीतसिंह मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख व हजारो ग्रामस्थांनी सोहळ्याचे तोफांच्या सलामीत स्वागत केले. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या वारकरी दिंडी समवेत तुकोबारायांचा पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयातील तिसर्‍या गोल रिंगणासाठी मार्गस्थ झाला. यावेळी रथाचे सारथ्य सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केले.



त्यानंतर मैदानावर मधोमध पालखी ठेवून वारकर्‍यांनी गोल रिंगण केले. यावेळी पादुकांचे व अश्‍वांचे पूजन माजी खा.विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, स.म.शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, सौ.सुलक्षणादेवी मोहिते-पाटील, प्रांताधिकारी शमा पवार, तहसिलदार अभिजीत पाटील, माजी जि.प.अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, धैर्यशिल मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील, सौ.शितलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सभापती सौ.वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, सौ.उर्वशीराजे मोहिते-पाटील, सौ.धनश्रीताई घुले-पाटील, उपसभापती किशोर सूळ, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, किशोरसिंह माने-पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील, संकल्प डोळस यांच्या हस्ते करण्यात आले.



टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषात रिंगण सोहळ्याला सुरूवात झाली. प्रारंभी सकाळी १०.३० वाजता पताकाधारी, त्यानंतर १०.४० वा. तुळशीवृंदावनधारी व हांडेवाल्या महिला, त्यानंतर १०.४७ वा. वीणेकरी व त्यानंतर १०.५५ वाजता पखवाज व टाळकरी यांना एकापाठोपाठ एक रिंगणासाठी सोडण्यात आले. त्यांनी तुकाराम तुकाराम असा नामघोष करीत एक रिंगण पूर्ण केले. टाळ्यांच्या व टाळ, मृदुंगाच्या गजरात चैतन्य निर्माण झाले. त्यानंतर ११.१० वाजता दोन्ही अश्‍वांना रिंगण दाखविण्यात आले. त्यानंतर देवाच्या अश्‍वास रिंगणासाठी सोडण्यात आले. या अश्‍वापाठोपाठ स्वाराचा अश्‍वही दौडीसाठी सज्ज झाला. पाहता पाहता दोन्ही अश्‍वांनी नेत्रदिपक दौड करून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्‍वांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पूर्ण झाला. यावेळी भाविकांनी पारंपारिक पद्धतीचे खेळ खेळले. झिम्मा, फुगडी, हुतुतू हे मैदानी खेळ रंगले. 

रिंगणानंतर सोहळा अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात विसावला. उद्या दि.८ रोजी सकाळी ८ वाजता हा सोहळा माळीनगरकडे मार्गस्थ होईल. माळीनगर येथे सोहळ्यातील उभे रिंगण होईल. उद्या सोहळ्याचा बोरगांव येथे मुक्काम आहे.
माळशिरस तालुक्यात संतांच्या पालख्यांचे आगमन
श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासमवेत संत सोपानकाका, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्‍वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी) यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे माळशिरस तालुक्यात आगमन झाले. या पालखी सोहळ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: